पुणे : विविध राजवटींच्या काळातील नाण्यांच्या रूपाने इतिहासाचा ठेवा जतन करून हा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पराग जगताप हा तरुण करत आहे. या तरुणाने सातवाहन ते मराठेशाहीपर्यंतच्या अशा एक हजारांहून अधिक नाण्यांचा संग्रह केला आहे. यामध्ये सातवाहन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराईचाही समावेश आहे.

जगताप म्हणाले, की लहानपणी आजोबांनी एक जुने नाणे मला दिले. त्या नाण्याने मला अशा प्रकारे नाणे संग्रहाची प्रेरणा दिली. मग अशी नाणी मिळतील तिथून जमा करण्याचा छंदच जडला. पाहता पाहता आज एक हजाराहून अधिक ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह जमा झालेला आहे.

जगताप यांच्या या संग्रहात सातवाहन ते मराठेशाहीपर्यंतच्या विविध राजवटींची नाणी आहेत. त्यांनी केवळ नाण्यांचा संग्रह केलेला नसून, या संग्रहातील प्रत्येक नाण्याचा काळ, राजवट, त्याचे नाव, वजन, धातू यांचाही तपशील जमा केलेला आहे. यासाठी ते विविध नाणे अभ्यासक, संस्थांच्या भेटी घेत असतात. त्यांच्याकडून या नाण्यांची माहिती घेत त्याद्वारे त्यांनी आपल्या संग्रहाला एका प्रदर्शनीय पुस्तकाचे रूप दिले आहे. जगताप यांच्या संग्रहात भारतातील नाण्याशिवाय अन्य देशातील नाण्यांचाही मोठा संग्रह आहे. या नाण्यांवरील भारतीय संस्कृतीच्या संबंधाचाही त्यांनी वेध घेतला आहे.

Story img Loader