देशात पुणे हे राजकीय नेत्यांचे कायम भेटीचे आवडते ठिकाण राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठमोठ्या नेत्यांनी भेट दिल्याचा पुण्याला वारसा आहे. कार्यक्रम, सभा, संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधान या सर्वोच्च पदावरील व्यक्ती पुण्याला भेट देत आल्या आहेत. पंतप्रधानांनी पुण्यात कोणत्या ठिकाणी भेट दिली, त्याच्या आठवणी सांगण्यातही पुणेकरांना अभिमान वाटत आला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत बहुतांश पंतप्रधानांनी पुणेरी आदरतिथ्य अनुभवले आहे. त्या अर्थाने ‘पुणे आवडे पंतप्रधानांना’ अशी पुण्याची ख्याती झाली आहे.
पंतप्रधानांनी भेट दिल्याच्या अनेक आठवणी पुणेकरांच्या स्मरणात आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३५ मध्येच पुण्याला भेट दिल्याची संस्मरणीय आठवण शांताबाई माने यांनी नोंदवून ठेवली आहे. माने या भवानी पेठेतील शाळा क्रमांक २३ या शाळेच्या १९३४ ते १९३६ पर्यंत मुख्याध्यापिका होत्या. त्या वेळी नेहरू यांनी या शाळेला भेट दिली होती. या शाळेमधील तिसरी आणि चौथीच्या मुलांबरोबर नेहरू यांनी ‘झुणका-भाकरी’चा आस्वाद घेतला होता. त्या वेळी गरीब मुलांबरोबर नेहरूंनी भोजन केल्याची पुण्यात चर्चा झाली होती.
हेही वाचा >>>पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान
नेहरू यांनी १९५७ मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि १९५८ मध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या संस्थांच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यात भेट दिली होती. १९६१ च्या पानशेतच्या पुरानंतर ते पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी महापालिकेमध्ये सभा घेऊन मार्गदर्शन केले होते. रोहिदास किराड हे त्या वेळी महापौरपदी होते.
इंदिरा गांधी यांना २२ नोव्हेंबर १९५४ रोजी पुणे महापालिकेने मानपत्र दिले होते. हा कार्यक्रम विश्रामबाग वाड्यात झाला होता. त्यानंतर १९७४ मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन सन्मानित केले होते. त्या निमित्ताने त्या पुण्यात आल्या होत्या. मोरारजी देसाई यांनीही पुण्याला भेट दिली होती. राजीव गांधी हे १९८७ मध्ये काँग्रेस भवन येथे, तर १९८८ मध्ये नेहरू स्टेडिअममधील मेळाव्याला उपस्थित राहिले होते.
व्ही. पी. सिंंग, पी. व्ही नरसिंह राव हे पंतप्रधान असताना आणि त्यानंतरही पुण्याला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट देत असत. अटलबिहारी वाजपेयी यांची फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर प्रचार सभा झाली होती. माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेस सोडून ‘पुणे विकास आघाडी’ स्थापन केली होती. तेव्हा भाजपने कलमाडी यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली होती. एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल, मनमोहन सिंंग यांनीदेखील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात भेटी दिल्या आहेत.
हेही वाचा >>>पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सहा वेळा पुणे भेट दिली आहे. २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी ते पुण्यात आले होते. २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडीपर्यंत मार्गाच्या लोकार्पण समारंभाला ते आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी ते येणार होते. मात्र, पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता. आता जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्याला पंतप्रधानांनी भेट दिल्याने पुण्याच्या इतिहासात आणखी भर पडली आहे. आजवरच्या पंतप्रधानांच्या या भेटी पाहिल्यास ‘पुणे आवडे पंतप्रधानांना’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
sujit. tambade@expressindia. Com