पुणे शहराचा विकास वेगाने होत असल्यामुळे येथे वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. वाहतूक आणि इतर जे काही प्रश्न असतील त्याबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिले.
आमदार मोहन जोशी यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालयात बांधण्यात आलेल्या ‘संस्कार भवनाचे’ उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर चंचला कोद्रे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, उपमहापौर सुनील गायकवाड, आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, माजी आमदार उल्हासदादा पवार, सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल आदी उपस्थित होते.
आमदार जोशी आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी पुण्याची वाहतूक हा मुख्य प्रश्न असल्याचे सांगितले. शासनाकडे वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर चव्हाण म्हणाले की, पुण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.  वाहतूक शाखेला कमी असलेले पोलीस मनुष्यबळ दिले जाईल. राज्यात पुढील पाच वर्षांत साठ हजार रिक्त पोलीस पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी वर्षांला बारा हजार यानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल. भरती केल्यानंतर पुणे वाहतूक शाखेला प्राधान्याने पदे दिली जातील. माझ्यासमोर ‘ट्रॅफीकॉप’ चा प्रकल्प आल्यानंतर त्यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल.
‘‘वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कडक शिक्षा करून शिस्त लावण्यासाठी त्याचे उदाहरण दाखवून देणे गरजेचे आहे. वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे प्रदूषण हा सुद्ध महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. त्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. पुण्यासारखे दुसरे शहर नाही. या शहराचे मूळ वैशिष्टय़ कायम ठेवून ‘पुणेपण’ जपायला हवे,’’ अशी भावनाही चव्हाण यांनी व्यक्त केली.