Pune Pub sends Condoms and ORS to customers : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. यादरम्यान पुण्यातील एका पबने पाठवलेल्या निमंत्रणावरून एकच गोंधळ उडाला आहे. हे निमंत्रण चांगलेच वादात सापडले असून यावरून पबवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी पुणे शहरातील एका पबने निमंत्रणे पाठवताना त्याबरोबर कंडोम आणि ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) पाठवल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने या पार्टीच्या आयोजकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे नेते अक्षय जैन यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, “आमच्या लक्षात आले की पबने त्यांच्या नियमित ग्राहकांना निमंत्रणे पाठवले आहेत, ज्यामध्ये कंडोम आणि ओआरएसचा समावेश आहे. ही कृती पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या विरोधात आहे. यामुळे तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. या फुटकळ प्रसिद्धीसाठी केलेल्या कृतीमुळे शहराची प्रतिमा खराब होईल. त्यामुळे आयोजकांवर कडक कारवाई झाली पाहिजे.”
पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून तक्रारीचे पत्र मिळाले आहे, तक्रार मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. नवीन वर्षाच्या सेलेब्रेशन सुरक्षितपणे केले जावे हे दाखवण्यासाठी आपण ही जाहिरात केल्याचे सांगितले. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.”
पोलिस आयुक्तांचा इशारा
पुणे शहरात नववर्षाचे स्वागत करताना नागरिक, तसेच पब, हॉटेल, तसेच मद्यालयाच्या चालकांनी नियमांचे पालन करावे यासंबंधी पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला जाणार असल्याचा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे शहरात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महात्मा गांधी रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात तरुणाईची गर्दी होते. शहरातील अशा १७ ठिकाणी गर्दी होते. त्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
हेही वाचा>> …तर नववर्षाची रात्र कोठडीत, मद्यपी वाहनचालकांना पोलीस आयुक्तांचा इशारा
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांतील हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून ४० पार्टी, तसेच इव्हेंटना परवानगी देण्यात आली आहे. ध्वनिवर्धक, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. अल्पवयीनांना मद्यविक्री करू नये. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.