पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या ‘कनेक्टिव्हिटीला’ प्राधान्य देण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) अर्थसंकल्प आणि मेट्रोच्या एकात्मिक वाहतूक आराखड्यात अनेक पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या एकात्मिक आराखड्यात पुरंदर विमानतळापर्यंतचा ‘कनेक्ट’ वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपीचे नवे मार्ग, पीएमपीचे टर्मिनल, रेल्वे जोड मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पातही पुरंदर विमानतळापर्यंतची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी अनेक जोड रस्ते, काँक्रिट रस्ते, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाला जोडणारे रस्ते, बाह्यवळण वर्तुळाकार मार्गाला जोडणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल ६३६ कोटींचा खर्च येत्या काही वर्षांत पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे.
एकात्मिक वाहतूक आराखड्यानुसार नियोजन
आराखड्यानुसार पुरंदर विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता वार्षिक ८.०१ लाख एवढी असून, ३९ हजार ३६९ टन एवढ्या कार्गोची वाहतूक होणार आहे. सध्या प्रस्तावित विमानतळाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यामुळे नव्याने काही मार्गात सुधारणा सुचविण्यात आली आहे. त्यानुसार पाच रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कोणत्या रस्त्यांमध्ये सुधारणा?
हडपसर-सासवड – दिवे घाट मार्गे जाणारा रस्ता, सासवड ते बोपदेव, उरूळी कांचन-जेजुरी रस्ता, सासवड-कापूरव्होळ-भोर रस्ता आणि खेड-शिवापूर सासवड लिंक रस्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. ही सुधारणा नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावरून विमानतळाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
राजेवाडी स्थानकापासून रेल्वे मार्गिका
पुरंदर येथील विमानतळावरून प्रवाशांना ये-जा करणे सहज शक्य व्हावे, यासाठी रेल्वेच्या सातारा मार्गावरील राजेवाडी रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत जोड रेल्वे मार्गिका विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.
सातारा रेल्वे मार्गावर प्रस्तावित विमानतळाजवळ जेजुरी आणि राजेवाडी ही दोन रेल्वे स्थानके आहेत. त्यातील राजेवाडी हे स्थानक विमानतळापासून नजीक आहे. त्यामुळे राजेवाडी ते विमानतळ या दरम्यान रेल्वेचा स्वतंत्र मार्ग (स्पूर लाइन) विकसित करण्यात येणार आहे. तसेच तळेगाव आणि दौंड स्थानकांना बाह्यवळण रेल्वे मार्गाने जोडण्याचेही नियोजित आहे. त्यासाठी दोन टप्प्यात कामे होणार असून तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यान उरूळी कांचनपर्यंत पूरक सेवा (फीडर सर्व्हिस) देण्यात येईल.
‘पीएमपी’चेही जाळे
पीएमपीच्या माध्यमातूनही विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी झेंडेवाडी ते वनपुरी हा मार्ग काळेवाडी मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच सासवड येथील पीएमपीच्या टर्मिनलचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच सात इंटर बस टर्मिनलही सासवड येथे असणार आहे.
पीएमआरडीएचे नियोजन
पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात रस्त्यांचे जाळेही ‘पीएमआरडीए’कडून विकसित केले जाणार आहे. त्यासाठी ६३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत काँक्रिटचे रस्ते, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांना जोडणारे रस्ते, बाह्य वर्तुळाकार मार्गाला जोडणारे रस्ते तयार करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. एकूण ६१ किलोमीटर लांबीच्या अंतरातील रस्ते या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत.
पीएमआरडीए कोणते रस्ते करणार?
रस्त्याचे नाव | रस्त्याची लांबी |
उरूळी कांचन ते जेजुरी | १५ किलोमीटर |
सासवड ते पारगाव चौफुला | १०.५० किलोमीटर |
बोपदेव घाट रस्ता | १९.५० किलोमीटर |
खेड शिवापूर ते सासवड | १६.०० किलोमीटर |
कापूरव्होळ ते सासवड | रस्ता कार्यान्वित |
दिवेघाट रस्ता | रस्ता कार्यान्वित |
प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी रस्त्यांचे जाळे विकसित करण्याला प्राधान्य देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत काँक्रिटचे रस्ते करण्यात येणार असून वर्तुळाकार मार्ग, राष्ट्रीय आणि राज्यमार्गांना ते जोडण्यात येतील. त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए