पुणे : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या ‘महाकुंभ’निमित्त सोडण्यात आलेल्या रेल्वेच्या फेऱ्यातून पुणे रेल्वे विभागाला १० कोटींपेक्षा अधिक उत्पंन्न मिळाले असल्याची माहिती मध्ये रेल्वे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी सोमवारी दिली, तर एक लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला असल्याचे यावेळी नमूद केले.
प्रयागराज येथील ‘महाकुंभ’निमित्त मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरून प्रयागराजसाठी विशेष रेल्वेच्या माहितीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत वर्मा बोलत होते. यावेळी सहायक वाणिज्य व्यवस्थापक कपिल शर्मा, शील भद्र-गौतम आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
वर्मा म्हणाले, ‘प्रयागराज येथील महाकुंभ निमित्त पुणे ते प्रयागराज अशा साप्ताहिक तीन आणि विशेष तीन रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले. जानेवारी ते तीन फेब्रुवारीपर्यंत साप्ताहिक सोडल्याजाणाऱ्या तीन नियमीत रेल्वे आणि विशेष तीन अशा एकूण सहा रेल्वेच्या ३३ दिवसात ६६ फेऱ्या केवळ प्रयागराजच्या दिशेने झाल्या आहेत. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावरून एक लाख सहा हजार ३३२ प्रवासांनी प्रवास केला. त्याद्वारे पुणे रेल्वे प्रशासनाला दहा कोटी ४८ लाख रुपयांचे उत्पंन्न मिळाले, तर ‘महाकुंभ’साठी पुण्यातून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अजुनही प्रवाशांकडून मागणी सुरू आहे.’
त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (१० फेब्रुवारी) महाकुंभ विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असली, तरी प्रयागराजच्या अलीकडे आठ स्थानकांवर थांबण्यासाठीची व्यवस्था केली आहे. त्यानुसार फाफमऊ, नैनी, प्रयागराज, संगम, प्रयागराज चौकी, प्रयागराज रामबाग, जुगी आणि सुबेदार गंज या स्थानकांपर्यंत जाता येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या अनुषंगाना रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आली आहे, असे वर्मा यांनी सांगितले.
– एक जानेवारी ते तीन फेब्रुवारी पर्यंत १,०६,३३२ प्रवाशांनी केला प्रवास
– एकूण कमाई – १०.४८ कोटी
– प्रत्येक आठवड्याला सहा रेल्वे धावल्या – एकूण ६१ फेऱ्या पूर्ण (जाणाऱ्या)