पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी फलाटांवर आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे केंद्र, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि सुविधांयुक्त फिरती स्वच्छतागृहे, सुरक्षिततेच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांच्या पिशव्या तपासणीसाठीची यंत्रणा, रेल्वे सुरक्षा पोलिसांची अतिरीक्त कुमक आणि गर्दीच्या अनुषंगाने पुणे रेल्वे व्यवस्थापन विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीत असुविधांमुळे होणारी प्रवाशांची गैरसोय टळणार असून सुरक्षितता निश्चित होणार आहे.

‘लोकसत्ता’ने गुरुवारच्या अंकात (२७ मार्च) ‘रेल्वे स्थानकात फलाटांवर गैरसोय’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन वर्मा यांनी रेल्वे स्थानकातील फलाटांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी प्रवाशांना सुविधा अपुऱ्या पडत असल्याची कबुली त्यांनी दिली आणि प्रवाशांना पुरेशा सुविधा तातडीने देण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

वर्मा म्हणाले, ‘सुट्यांच्या कालावधीत किंवा सण-उत्सवानिमित्त प्रवाशांची गर्दी असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांची रेल्वेला मागणी वाढली आहे. इतर काळातही प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रति दिवस एक लाखांहून अधिक प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे सुविधा अपुऱ्या पडत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याने अधिकाऱ्यांना तशा सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आसन व्यवस्था, पंखे, उद्वाहन (लिफ्ट), थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, महिला-पुरुषांसाठी फिरते स्वच्छतागृह ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.’

‘गर्दी होत असल्याने प्रवाशांना रेल्वेच्या वेळापत्रकानुसार स्थानकावरून रांगेत मार्गस्थ करण्यात येईल. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा पोलीस बलाच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, जुने सीसीटीव्ही काढून अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविणे आणि १२० हून अधिक सीसीटीव्ही वाढविणार आहे. प्रवासी पिशव्यांच्या तपासणीसाठी तीन यंत्रे, प्रवाशांव्यतिरिक्त स्थानकात झोपलेल्या नागरिकांची तपासणी, फलाटांवरील स्वच्छता याबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे वर्मा यांनी नमूद केले.

रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत आणि पायभूत सुविधांची अंमबजावणी पूर्वीच करणे अपेक्षित होते. प्रवाशांची गैरसोय झाल्याने प्रवासावर परिणाम होतो. मात्र, नव्याने सुविधांची अंमलबजावणी करण्यात येत असल्यास त्याचा प्रवाशांना त्याचबरोबर रेल्वेलाही फायदा होईल.

हर्षदीप सिंह, प्रवासी

उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे प्रवासासाठी आणखी गर्दी वाढणार आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांसाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्थानकांवर प्रामुख्याने स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

शैलजा ठोंबरे, प्रवासी