पुणे : धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई करण्याचा इशारा लोहमार्ग पोलिसांनी दिला आहे. होळी, तसेच धुलीवंदनानिमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

होळी, तसेच धुलीवंदनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रंग खेळला जातो. उत्साहाच्या भरात काही जण धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकतात. दाट वस्तीतून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर फुगे फेकण्यात येतात. या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिसांकडून पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, लोणावळा, चिंचवड तसेच दौंड स्थानक परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. धावत्या रेल्वे गाडीवर फुगे फेकल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.

चिंचवड, खडकी, दौंड, लोणावळा परिसरात गेल्या वर्षी धावत्या रेल्वेगाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. काही जण रंगाने भरलेल्या फुग्यात दुषित पाणी भरतात. फुगे फेकण्याच्या घटना रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. प्रमुख स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक दोशी यांनी नमूद केले.

शहरातील बंदोबस्तात वाढ

होळी, धुलिवंदनानिमित्त पुणे शहर, परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Story img Loader