मुंबईमध्ये भारतातील पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढील पाच ते सहा वर्षांतच पुण्याची रेल्वे सुरू झाली. पुणे हे लष्कराचे प्रमुख ठाणे असल्याने ब्रिटिशांनी पुण्यातील रेल्वेसाठी विशेष लक्ष दिले. त्यातूनच रेल्वे स्थानकासाठी विशेष रचनेची एक देखणी इमारत उभी राहिली आणि मोठ्या दिमाखात तिचे उद्घाटन झाले, तो दिवस होता २७ जुलै १९२५. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही इमारत बुधवारी ९८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर १९२२ मध्ये इमारतीचे काम सुरू करण्यात आले. पुढील तीनच वर्षांत मुख्य अभियंता जेम्स बेर्कक्ले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या समारंभासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वे करण्यात आली होती. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता. पुणे स्थानकाच्या आराखड्यानुसार लाहोर रेल्वे स्थानकाची इमारतही उभारण्यात आली.
पुण्याच्या इमारतीला काही वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्थानक म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या इमारतीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जाही मिळालेला आहे. इमारतीच्या उद्घाटनानंतर १९२९ मध्ये पुणे स्थानकावरून विजेवरील रेल्वे धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन गाडी सुरू झाली. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेसही त्याच दरम्यान सुरू झाली. अशा अनेक गोष्टींचा व रेल्वेच्या वाढत्या व्यापाची साक्षीदार असलेली ही इमारत बुधवारी ९७ वर्षे पूर्ण करून ९८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
पुणे स्थानकाचा संपूर्ण इतिहास तोंडपाठ असलेल्या रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा या दरवर्षी इमारतीचा वाढदिवस साजरा करतात. त्यानुसार यंदाही त्या या वाढिदवसासाठी पुढाकार घेणार आहेत. सकाळी स्थानकात फलाट क्रमांक एकवर केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अनेक घटनांची साक्षीदार
पुणे शहर आणि परिसराचा गेल्या ९७ वर्षांत विविध अंगांनी कालापालट झाला. प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. पुणे रेल्वे स्थानकासाठी नवी इमारत बांधण्यात आली तेव्हा स्थानकातून दिवसभरात केवळ २० गाड्या ये-जा करीत होत्या. आता ही संख्या साडेतीनशे गाड्यांहूनही अधिक झाली आहे. या ऐतिहासिक इमारतीने पानशेतचा पूर, कोयनेचा भूकंप असे विविध धक्केही अनुभवले आहेत.