पुणे : सध्या उन्हाळी सुट्यांचा हंगाम असल्याने रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे उत्तरेतील राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांमुळे या गर्दीत आणखी भर पडत आहे. अनेक प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट गाड्यांमध्ये घुसत आहेत. यामुळे रेल्वेने तिकीट तपासणीवर भर दिला असून, एप्रिल महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून तीन कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ही कामगिरी केली आहे. पुणे विभागात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुणे स्थानकावर प्रामुख्याने तिकीट तपासणीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्या आणि उत्तरेकडील राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे जाणारे स्थलांतरित कामगार यांची गर्दी मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांना दिसत आहे. गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट घुसतात. त्यांच्यामुळे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होतो. या गाड्यांना गर्दी जास्त असल्यामुळे आतमध्ये जाऊन तिकीट तपासणी करण्यातही अडचणी येतात.
हेही वाचा : पुणे : शहरातील एक हजार गुंडांची झाडाझडती
रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबी विचारात घेऊन स्थानकावर प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले आहेत. या मोहिमेत रेल्वेने एप्रिल महिन्यात ३५ हजार २१९ विनातिकीट प्रवासी पकडले. त्यांच्याकडून ३ कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. म्हणजेच दिवसाला दहा लाख रुपये दंड फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेला मिळाला आहे.
तसेच, अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अनेक प्रवासी पूर्ण प्रवासाचे तिकीट काढण्याऐवजी मधील स्थानकाचे तिकीट काढतात. अशा १४ हजार ४६३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९३ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचबरोबर नोंदणी न करता सामान घेऊन जाणाऱ्या २४३ प्रवाशांकडून ३३ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
हेही वाचा : पुणे : मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वेधशाळा चौकात वाहतूक बदल
उन्हाळी सुट्या आणि लोकसभा निवडणुकीमुळे उत्तरेकडील राज्यांत जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान फलाटावर तैनात करण्यात आले आहेत.
डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक