पुणे : दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे पुणे विभागाकडून उत्तरेकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्या पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात येत आहेत. महाकुंभसाठी प्रवाशांची गर्दी असल्याने रेल्वे सुरक्षा पोलीस, सुरक्षा रक्षक आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणारा महाकुंभ अंतिम टप्प्यात असताना प्रवाशांची प्रयागराजच्या दिशेने जाण्यासाठी धडपड कायम आहे. रस्ते मार्ग, रेल्वे आणि हवाई सेवेला अद्यापही मागणी आहे. त्यातच दिल्ली येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊन चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ व्यक्तींचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक स्थानकावर सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून दानापूरला जाणारी साप्ताहिक रेल्वे कडेकोट बंदोबस्तात प्रयागराजच्या दिशेने रवाना करण्यात आली. सामान्य डब्याचे शुल्क मोजलेल्या प्रवाशांची स्वतंत्र रांग तयार करून डब्यात प्रवेश दिला जात आहे. तसेच प्रवासी क्षमता पूर्ण झाल्यानंतर उर्वरित प्रवाशांना माघारी पाठवले जात आहे. शयन डबा, द्वितीय, तृतीय श्रेणीतील वातानुकूलित डब्यामध्ये गर्दी करण्यात येत आहे. त्यांची तपासणी करून अशा प्रवाशांना खाली उतरविण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्थानकातून रेल्वेचा शेवटचा डबा मार्गस्थ होईपर्यंत रेल्वे सुरक्षा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
माघारी पाठवल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
रविवारी पुणे-दानापूर रेल्वेच्या शयनकक्ष, द्वितीय, तृतीय श्रेणीतील आसन निश्चित असल्याने आसनक्षमता पूर्ण झाल्यानंतर संबंधित डब्यांचे दरवाजे लावून घेण्यात आले, तर गाडीसाठी चार सामान्य डब्यांतील प्रवासी क्षमता पूर्ण झाल्यानंतर रांगेतील उर्वरित प्रवाशांना माघारी पाठविण्यात आले. मात्र, प्रवाशांकडून प्रवासासाठी मागणी कायम असल्याने वादावादीसारख्या घटना घडल्या. संबंधित प्रवाशांना पैसे पुन्हा देण्याच्या बोलीवर स्थानकावरून गर्दी हटविण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
सुरक्षित प्रवास आणि प्रवाशांची सुरक्षितता या अनुषंगाने पुणे रेल्वे सुरक्षा पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रयागराज येथे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी कायम आहे. त्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी रेल्वे पोलिसांकडून सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात आले आहे.
पी. बी. उबाळे, उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल
सुरक्षात्मक नियोजन
● रेल्वे येण्यापूर्वी सामान्य डब्यातील प्रवाशांची स्वतंत्र रांग
● रेल्वे सुरक्षा पोलीस, सुरक्षारक्षक आणि रेल्वे अधिकारी, कर्मचारी स्थानकावर
● १६ तिकीट तपासणीस, १ नोडल अधिकारी, २० रेल्वे सुरक्षा पोलिसांची नेमणूक
● आसनक्षमता पूर्ण होताच उर्वरित प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी सुविधा