पुणे : उन्हाच्या तीव्र झळा, प्रवाशांची गर्दी, अपुरी आसन व्यवस्था, प्रतीक्षाकक्षात गर्दी, त्यामुळे स्थानकातील फरशीवर रेल्वेच्या प्रतीक्षेत बसलेले प्रवासी, बंद पडलेले शौचालय, बंद असलेली बॅटरीवरची वाहने, सुरू न झालेली उद्वाहन सुविधा आणि त्यामुळे त्रस्त प्रवासी… पुणे रेल्वे स्थानकात सध्या असे चित्र दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ सुरू होत असल्याने रेल्वे गाड्यांना गर्दी वाढत असताना, त्यात स्थानकावर प्रवाशांना अशा असुविधांचा सामना करावा लागतो आहे.
‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने स्थानकावर जाऊन जी स्थिती प्रत्यक्ष पाहिली, त्यातून हे चित्र दिसून आले. पुणे रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या ७२ प्रवासी, तर ८० मालगाड्या गाड्या दररोज धावतात. त्यातून प्रवास करण्यासाठी एक लाखांहून अधिक प्रवासी दिवसभरात स्थानकावर येतात. मात्र, सुविधांची वानवा असल्याचे दिसते.
स्थानकात शिरताना मुळात आधी कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरही हातात सामान घेऊन चारचाकी, दुचाकी, रिक्षा, विक्रेते यांच्या गर्दीतून वाट काढत फलाटापर्यंत जावे लागते. स्थानकावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुविधेसाठी असलेली ‘विशेष प्रवासी सशुल्क बॅटरी ऑपरेटेड कार’ सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंदच आहे. तसेच, उद्वाहन सुविधाही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी ज्येष्ठ, दिव्यांग आणि महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
वातानुकूलित, तसेच अन्य प्रतीक्षा कक्षांत आसनक्षमता कमी असल्याने ते अपुरे पडतात. परिणामी, अनेक प्रवाशांना फलाटांच्या फरशांवर बसून किंवा कोपऱ्यांचा आसरा घेऊन प्रतीक्षा करावी लागते. अनेक प्रवासी फलाटाच्या मधोमध बसत वा झोपत असल्याने अन्य प्रवाशांना त्यांच्या मधून वाट काढत जावे लागते. सर्वच फलाटांवर ही अवस्था दिसते. त्यातच फलाट क्रमांक एकवरील स्वच्छतागृह काम सुरू असल्याने बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
नागपूरला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वी स्थानकाबाहेर लागलेल्या बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीतून मार्ग काढत आले. स्थानकावर आल्यावर जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेल्या, झोपलेल्या प्रवाशांमुळे अडचण झाली. प्रवाशांची वाढती संख्या पाहता, रेल्वेने तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. – मीनाक्षी कोकाटे, प्रवासी
रेल्वे बोर्डाच्या मानकानुसार एका फलाटावर किमान ६०० आसने असणे अपेक्षित आहे. सध्या एकूण दोन हजार ७४४ आसने उपलब्ध करून दिली आहेत. नव्याने २०० आसनांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. तसेच, फलाट क्रमांक एकवरील स्वच्छतागृहाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याने ते बंद आहे. लवकरच स्वच्छतागृह सुरू करण्यात येईल. बॅटरीवरील कार पादचारी पुलावरील सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. लवकरच त्या सुरू करण्यात येतील. – राजेश कुमार वर्मा, व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग