पुणे : रेल्वे स्थानकातील प्रीपेड रिक्षा केंद्राला मोठी मागणी असताना हे केंद्र बंद करण्याचा निर्णय रिक्षाचालक संघटनेने घेतला आहे. स्थानिक रिक्षाचालकांकडून वारंवार अडवणूक केली जात असल्याने वादावादी होऊन गुन्हे दाखल होईपर्यंत घटना घडत आहेत. या बाबत पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने रिक्षा चालक संघटनेने प्रीपेड रिक्षा केंद्र बंद करण्ययाचा निर्णय घेतला आहे. दोन संघटनांच्या वादविवादामुळे प्रवाशांची पुन्हा एकदा फरफट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेल्वे प्रवाशांना स्थानकावर आल्यानंतर रिक्षाचालकांकडून लुटण्याच्या घटना, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडेदर आकारण्यावरून वादविवाद झाल्याच्या घटनाही समोर आल्या. प्रवाशांनी तक्रारी केल्यामुळे रेल्वे प्रशासन, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे वाहतूक पोलीस यांच्या समितीने ठरवून दिलेल्या नियमानुसार पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ‘प्रीपेड रिक्षा केंद्र’ सुरू करण्यात आले. समितीने ठरवून दिलेल्या नियम आणि निकषानुसार प्रति किलोमीटर १७ रुपये दरानुसार प्रवाशांकडून भाडे निश्चित करण्यात आले. दरम्यान, प्रवासापूर्वी रिक्षाची नोंदणी, प्रवासाचे निश्चित ठिकाण, रिक्षाचालक आणि शुल्क आदी माहिती अगोदरच प्रवाशाला देणे बंधनकारक केले, तर नोंदणी नसलेल्या तसेच स्थानिक रिक्षाचालकांना परिवहन विभागाच्या निर्देशानुसार २२ ते २५ रुपये दर असल्याने प्रवाशांना प्रीपेड रिक्षाचा सुलभ प्रवास आणि सुरक्षिततेची हमी मिळत असल्याने मागणी वाढली. त्यानुसार आतापर्यंत प्रीपेड रिक्षा केंद्रातून १८ हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर, आतापर्यंत दीड कोटी रुपयांची बचत करून दिली असल्याची माहिती ‘बघतोय रिक्षावाला’ संघटना आणि गिग कामगार संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर म्हणाले, ‘रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड रिक्षा केंद्राला प्रवाशांकडून चांगली मागणी आहे. रिक्षाचालकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. मात्र, स्थानिक रिक्षाचालक आणि नोंदणी नसलेल्या रिक्षाचालकांकडून केंद्रातील रिक्षाचालकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यामुळे अनेकदा वादविवाद आणि त्याचे रूपांतर मारामारीत होऊन पोलीस ठाण्यापर्यंत प्रकार गेले आहेत. बंडगार्डन पोलीस ठाण्यात १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, पोलिसांकडून कारवाई केली जात नसून याबाबत रेल्वे प्रशासन आणि आरटीओ प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मात्र, याबाबत ठोस कृती होत नसल्याने वातावरण अधिकच संवेदनशील झाले आहे.’
तसेच महिला रिक्षाचालकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्याचबरोबर ‘गुलाबी रिक्षा’ (पिंक ई रिक्षा) चालकांना या प्रीपेड केंद्रामध्ये सामावून घेतले आहे. मात्र, असंघटित रिक्षाचालकांकडून महिला प्रवाशांची अडवणूक केली जात आहे, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
‘एका रिक्षाचालकाने दारूच्या नशेत प्रीपेड बूथ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या एका महिला रिक्षाचालकाला त्रास देण्याचा आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद रिक्षाचालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. बंडगार्डन पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले, पण कोणतीही कारवाई न करताच सोडून दिले. तोच रिक्षाचालक रेल्वे स्थानक परिसरात येऊन संबंधित महिला चालकाला धमकावत असल्याने भीतीचे वातावरण आहे.’
कर्मचारी, प्रीपेड रिक्षा केंद्र
रेल्वे स्थानकातील प्रीपेड रिक्षा केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्याकडे माहिती पाठवली आहे. याबाबत पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येईल.
स्वप्नील भोसले, आरटीओ, पुणे