पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ‘प्रीपेड ऑटो रिक्षा’ सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला असून ३१ लाखांपेक्षा जास्त व्यवहार या सुविधेमार्फत झाले आहेत. प्रवासी सेवा संघाचा करार संपुष्टात आल्यानंतर तीन महिन्यांपासून ही सुविधा बंद करण्यात आली होती.
रेल्वे स्थानकातील परिसरात मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्रीपेड ऑटो रिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आतापर्यंत एक हजार २४९ रिक्षाचालकांंनी नोंदणी केली आहे. प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठी अगोदरच ऑनलाइन शुल्क घेतले जात आहे. त्यामुळे तक्रारी, वादविवाद या घटनांना पूर्णत: आळा घालता येणे शक्य झाले आहे. तसेच बेकायदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूटमार रोखण्यात फायदा होत असल्याचा दावा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात आला आहे.
हेही वाचा : Pune Winter News: पुणे गारठले; यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद
पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांकडून बेकायदा पद्धतीने प्रवाशांकडून प्रवासी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आरटीओ, पुणे शहर वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन, पुणे महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक संघटनेच्या सदस्यांवर या समितीने दिलेले निकष बंधनकारक आहेत. तसेच खटुआ समितीच्या निर्देशानुसार पाच किलोमीटर अंतर असल्यास नियमित दरापेक्षा १० टक्के जास्त शुल्क आणि त्यापेक्षा जास्त अंतर असल्यास १५ टक्के जास्त शुल्क आकारले जात आहे, अशी माहिती पुणे आरटीओचे अधिकारी स्पप्नील भोसले यांनी दिली.
हेही वाचा : छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करा – ओबीसी नेते लक्ष्मण हाके
जुलै २०२४ मध्ये वाहतूक संघटनेसोबत असलेला करार संपुष्टात आल्याने, तसेच नोंदणीकृत सदस्यांपैकी काही सदस्यांच्या कागदपत्रांमध्ये अपूर्तता आढळून आल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, संघटनेने ही प्रक्रिया पूर्ण केल्याने रेल्वे स्थानकातील ‘प्रीपेड ऑटो रिक्षा’ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच
काय आहेत फायदे?
- रेल्वे स्थानकात बेकायदा रिक्षाचालकांना रोखण्यास मदत होत आहे.
- भांडणे, तक्रारी टाळण्यास मदत होत आहे.
- शुल्क निश्चित केल्याने प्रवाशांची लूटमार थांबविणे शक्य होत आहे.
- ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येणे शक्य झाले आहे.