लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: रेल्वे स्थानकात प्रवाशांचे साहित्य, पिशव्या तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिले.
सहायक पोलीस फौजदार बाळू पाटोळे, हवालदार सुनील व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनवणे अशी निलंबत करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सहा पोलीस कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ३ एप्रिल रोजी सहा पोलीस कर्मचाऱ्यांना घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडील साहित्य आणि पिशव्या तपासणीचे काम देण्यात आले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या आवरात एका युवक आणि त्याच्या बरोबर असलेल्या मैत्रिणीला सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून चौकशी सुरु केली. त्यांच्याकडे असलेल्या साहित्य आणि पिशव्यांची तपासणी केली. त्यांच्या पिशवीत गांजा असल्याचा संशयावरुन त्यांची चौकशी करण्यात आली. दोघांना लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर हजर करण्यात आले. पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली. पोलीस ठाण्यातील कामकाज नोंदवहीत (स्टेशन डायरी) नोंदही करण्यात आली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना सोडून देण्यात आले.
आणखी वाचा- ‘आरटीओ’ मालामाल! तिजोरीत २ हजार ८३५ कोटींचा महसूल
युवक आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, अशी माहिती मुंबईतील लोहमार्ग पोलीस महासंचालक कार्यालयातून लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांना देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यानंतर लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
सहा पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना त्यांनी कसुरी केली तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेऊन त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिले. सहायक फौजदार बाळू पाटोळे, सुनील पाटोळे यांच्या विरुद्ध प्रवाशांचे साहित्य तपासणीत गैरप्रकार केल्याने यापूर्वी एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गैरप्रकार करणाऱ्या दोघांची पुन्हा रेल्वे स्थानकात नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, जून २०२१ मध्ये लोहमार्ग पोलीस ठाण्यातील तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह आठ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश लोहमार्ग पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी दिले होते. अमली पदार्थ प्रकरणात गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.