पुणे : लोहमार्गावर अथवा रेल्वेच्या परिसरात पाळीव जनावरांमुळे अनेक वेळा अपघात घडतात. हे अपघात रोखण्यासाठी आता रेल्वेच्या पुणे विभागाने मोहीम हाती घेतली आहे. यात या जनावरांच्या मालकांचे समुपदेशन केले जात आहे. त्यानंतरही ही जनावरे रेल्वे परिसरात आल्यास मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या तीन सराफा व्यावसायिकांवर ‘मोक्का’
लोहमार्ग आणि रेल्वे आवारात पाळीव प्राण्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या अपघातांमुळे दररोज लाखो रेल्वे प्रवाशांचा प्रवास विस्कळीत होतो. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि वक्तशीरपणा सुनिश्चित करण्यासाठी हे अपघात रोखण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पाळीव जनावरांमुळे होणारे रेल्वे अपघात शून्यावर आणण्याची मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत पाळीव जनावरांना रेल्वे परिसरात आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सुरुवातीला यासाठी जनावरांच्या मालकांचे समुपदेशन केले जात आहे. त्यांना रेल्वे अपघातांबाबत जनजागृती करणाऱ्या पत्रकांचे वाटप केले जात आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पुणे विभागात लोहमार्ग पर्यवेक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून ही मोहीम विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
हेही वाचा >>> नववर्षाच्या मध्यरात्री गोव्यातील एक कोटी रुपयांचे मद्य जप्त; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
अपघात टाळण्यासाठी सहकार्य कराया मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या आवारात अथवा लोहमार्गाजवळ जनावरे आल्यास किंवा अपघात झाल्यास रेल्वे प्रशासन संबंधित मालकांवर रेल्वे कायदा कलम १५४ आणि अन्य संबंधित कलमांनुसार आवश्यक कारवाई करणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि वक्तशीरपणा सुनिश्चित करण्यासाठी तुमची पाळीव जनावरे रेल्वेच्या आवारात सोडू नका. हे अपघात टाळण्यासाठी रेल्वेला सहकार्य करा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.