पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाने तब्बल दीड महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी हजेरी लावली. वरसगाव धरणात ३८ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत धरणात १९ मिलिमीटर, तर खडकवासला धरणात ९ मिलिमीटरची नोंद झाली. पुणे शहर व पिंपर-चिंचवड परिसरातही बुधवारी पावसाने हजेरी लावली. पुण्याच्या परिसरात गुरुवारी व शुक्रवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात मंगळवारपासून वादळी पावसाचे वातावरण आहे. अनेक भागात मंगळवारी पावसाच्या सरी पडल्या. मात्र, धरणांच्या क्षेत्रात पावसाची नोंद झाली नाही. बुधवारी मात्र पुणे, पिंपरी-चिंचवडप्रमाणे धरणांच्या क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. दिवसभरात सायंकाळी साडेपाचपर्यंत खडकवासला, वरसगाव, पानशेत या धरणांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र, टेमघर धरणावर केवळ १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली पाहायला मिळाली नाही. सध्या पुण्यासाठीच्या चारही धरणांमध्ये मिळून १४.५४ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत हे प्रमाण ४९.८९ टक्के आहे.
याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की धरणांच्या क्षेत्रात सुमारे दीड महिन्यांनी मोठा पाऊस झाला. मात्र, तो वादळी स्वरूपाचा असल्याने सर्वच भागात एकसारखा पडला नाही. परिणामी, या पावसामुळे लगेच तरी धरणांच्या साठय़ात विशेष वाढ होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने या काळात किती पाऊस पडतो, याबाबत उत्सुकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा