पुणे : गेल्या काही दिवसांत गारवा कमी होऊन उन्हाचा चटका वाढला होता. वातावरणात झालेल्या या बदलांमुळे शुक्रवारी सकाळी शहराच्या काही उपनगरांमध्ये हलक्या सरी बरसल्या. बदललेल्या हवामानानुसार भारतीय हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यात काही ठिकाणी यलो अलर्टही देण्यात आला आहे.
हेही वाचा : पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
गुरुवारी उन्हाची आणि उकाड्याची तीव्रता चांगलीच वाढली होती. तर रात्री तापमानात घट होऊन गारवा जाणवू लागला होता. मात्र शुक्रवारी सकाळी पावसाच्या सरी बरसल्याचे दिसून आले. त्यात मुंढवा, कात्रज, मध्यवर्ती पेठा, सूस, लोहगाव, देहु, कोरेगाव पार्क अशा भागांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव पार्क येथे १.५ मिलीमाटर, एनडीए येथे ०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच आज आणि शनिवारी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.