Pune Rain Update : पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट इतकी आहे. खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अचानक परिसरात पाण्याची वाढ झाल्याने महिला, रुग्ण आणि नवजात बालकांचे हाल झाले आहेत. काहींनी पुणे महानगर पालिकेच्या आयुक्तांवरच टीका केली आहे.
पुण्यातील एकता नगरमधील एका महिलेने टीव्ही ९ शी संवाद साधताना प्रशासनावर टीका केली. त्या म्हणाल्या, “रात्री पाणी सोडण्याआधी पूर्वसूचना का दिली नाही? आमचं वाटोळं झालं आहे, त्यामुळे आयुक्तांना आधी येथे बोलवा. त्यांनी रात्री का पाणी का सोडलं? असा जाब त्यांनी विचारला.
“दहा दिवसांच्या बाळाला पाण्यातून बाहेर काढलं आहे. अडीच किलोच बाळ आहे, आजारी बाळ आहे. पण कोणी मदतीला आलं नाही. आम्ही रात्रीपासून जागे आहोत. आता कोणी सुद्धा यायचं नाही इथं. न सांगता पाणी सोडलं. आमची वाट लागली आहे. कोणत्याही नगरसेवकाने इकडे यायचं नाही. आम्ही उपाशी राहणार नाही. आमचे नातेवाईक आहेत येथे खायला द्यायला. याचा बंदोबस्त करा आयुक्तांना म्हणा. आता आम्हाला भरपाई कोण देणार”, असा संताप या महिलेने व्यक्त केला.
जास्तीत जास्त पाणी सोडा – अजित पवार
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. (Pune Rain)
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सायंकाळ होईपर्यंत जास्तीत जास्त पाणी धरणांमधून नदीत सोडण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. दिवसा जास्त पाणी सोडल्यास रात्री धरणांच्या परिसरात पाऊस झाल्यास ते पाणी (Pune Rain) साठविता येईल. परिणामी नागरिकांना त्रास होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.