संजय जाधव, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरातील वाहनसंख्या वाढत असून, अरुंद रस्ते आणि त्यातच अनेक ठिकाणी सुरू असलेले मेट्रोचे काम यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळेच गेल्या वर्षात सर्वांत जास्त वाहतूक कोंडी असलेल्या जगभरातील शहरात पुण्याचा सातवा क्रमांक लागला आहे. पुणेकरांना केवळ १० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी २०२३ मध्ये सरासरी २७ मिनिटे ५० सेंकदांचा वेळ लागला.

हेही वाचा >>> पुणे: पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा; म्हणाले, ‘चिरीमिरी घ्याल तर…’

‘टॉमटॉम वाहतूक निर्देशांक २०२३’ जाहीर करण्यात आला. यात ६ खंडांतील जगभरातील ५५ देशांतील ३८७ शहरांचा समावेश आहे. या शहरांतील वाहतूक कोंडीची पाहणी करून त्यांची क्रमवारी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील आघाडीच्या शहरांमध्ये पुण्याने सातवा क्रमांक मिळवला आहे. या यादीत भारतातील बंगळुरू सहाव्या स्थानी आहे. देशाची राजधानी दिल्ली ४४ व्या स्थानी, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ५४ व्या स्थानी आहे.

हेही वाचा >>> भाजपाचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश…भिंती रंगवा, प्रचार करा!

पुणेकरांनी किमान एक दिवस जरी घरातून काम केले तर त्यातून वर्षभरात मोठा फायदा होणार आहे. पुणेकरांनी दर शुक्रवारी घरून काम केले तर त्यातून त्यांचा सरासरी १० किलोमीटरचा वाहन प्रवास टळणार आहे. त्यातून प्रत्येक पुणेकराची वर्षाला ५१ तासांची बचत होणार असून, त्यातून प्रत्येकी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन २०० किलोने कमी होईल. हेच घरून काम बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस केल्यास त्यातून प्रत्येक पुणेकराची १५४ तासांची बचत होईल आणि त्यातून प्रत्येकी ५९९ किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होईल.

पुण्यातील वाहतूक कोंडी (२०२३)

सरासरी वाहनाचा वेग – ताशी १९ किलोमीटर

१० किलोमीटर प्रवासासाठी सरासरी वेळ – २७ मिनिटे ५० सेकंद

प्रत्येकाने वाहतूक कोंडीत घालविलेला वेळ – ५ दिवस ८ तास

सर्वाधिक वाहतूक कोंडीचा दिवस – ८ सप्टेंबर २०२३

सर्वाधिक वाहतूक कोंडीचा रस्ता – गणेशखिंड रस्ता

सरासरी वाहन चालविण्याचा वेळ

एका व्यक्तीचा सरासरी वेळ – २५६ तास

कोंडीमुळे सरासरी वेळेत झालेली वाढ – १२८ तास

कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन

एका मोटारीमुळे वार्षिक उत्सर्जन – १००७ किलो

कोंडीमुळे उत्सर्जनात झालेली वाढ – २५६ किलो

वाहन घेऊन कधी बाहेर पडू नये…

वार – शुक्रवार

वेळ – सायंकाळी ६ ते ७

१० किलोमीटरसाठी सरासरी वेळ – ३७ मिनिटे