पुणे : प्रवासादरम्यान प्रवासी अनेक वेळा वस्तू विसरतात. देशाची राजधानी दिल्लीतील प्रवासी सर्वाधिक विसरभोळे असल्याचे समोर आले आहे. आर्थिक राजधानी असलेली मुंबई दुसऱ्या स्थानी असून, पुणे पाचव्या स्थानी आहे. प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तूंमध्ये मोबाइल फोनचे आणि लॅपटॉप बॅगचे प्रमाण सर्वांत जास्त आहे.
हेही वाचा >>> पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील उबरने ‘लॉस्ट अँड फाऊंड निर्देशांक २०२४’ जाहीर केला आहे. या निर्देशांकात दिल्लीने प्रथम स्थान पटकावले आहे. त्यानंतर मुंबईने दुसरे स्थान कायम राखले आहे. बंगळुरूने हैदराबादला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे. या निर्देशांकात पुणे पाचव्या स्थानी आहे. गेल्या वर्षभरात विसरलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये मोबाइल फोन, लॅपटॉप बॅग, कपडे यांचा समावेश आहे. तसेच चावी, पाण्याची बाटली यांसह चष्मा आणि दागिनेही प्रवासी विसरल्याचे समोर आले आहे. काही वेळा प्रवाशांनी युकूलेली वाद्य, नाण्यांचा संग्रह, प्रसाद, ट्रीमर आणि पारपत्रासारखी महत्त्वाची कागदपत्रे विसरल्याचेही प्रकार घडले आहेत.
हेही वाचा >>> पुणे मेट्रो सुसाट! प्रवासी संख्ये सोबतच उत्पन्नातही मोठी वाढ
सर्वसाधारपणे प्रवाशांनी उबरमध्ये वस्तू विसरण्याचे प्रमाण शनिवारी जास्त आहे. विसरलेल्या वस्तूंमध्ये निळ्या रंगाच्या वस्तूंचे प्रमाण अधिक असून, त्याखालोखाल लाल आणि गुलाबी रंगाच्या वस्तूंचा समावेश आहे. प्रवासी संध्याकाळी सातच्या सुमारास वस्तू विसरण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षभरात दिवाळीच्या काळात प्रवाशांनी वस्तू हरवण्याचे प्रमाण जास्त होते, असे उबरने म्हटले आहे.
उबरची सेवा वापरताना प्रवासी वाहनात एखादी वस्तू विसरल्यास त्याला उबरच्या उपयोजनामध्ये ‘लॉस्ट अँड फाऊंड’चा पर्याय असतो. या पर्यायाचा वापर करून तो विसरलेल्या वस्तूबाबत माहिती देऊ शकतो. त्यानंतर उबरकडून संबंधित चालकाशी संपर्क साधून ती वस्तू परत मिळवून दिली जाते. लॉस्ट अँड फाऊंड पर्यायाचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या माहितीच्या आधारे उबरने हा निर्देशांक बनवला आहे.
सर्वाधिक विसरभोळी शहरे
१ – दिल्ली
२ – मुंबई</p>
३- बंगळुरू
४ – हैदराबाद
५ – पुणे
सर्वाधिक विसरल्या जाणाऱ्या वस्तू मोबाइल फोन, लॅपटॉप बॅग, कपडे, चावी, हेडफोन, पाकीट, चष्मा अथवा गॉगल, पाण्याची बाटली, दागिने, घड्याळ.