पुणे : देशात काम करणाऱ्या महिलांसाठी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात पुण्याने पहिल्या पाचांत स्थान पटकाविले आहे. अवतार ग्रुपने केलेल्या या सर्वेक्षणात बेंगळुरू पहिल्या स्थानी असून, मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. मनुष्यबळ सल्लागार क्षेत्रातील अवतार ग्रुपने ‘महिलांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट शहरे‘ सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या पुण्याला या सर्वेक्षणात पाचवे स्थान मिळाले आहे. काम करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने सर्वाधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनक्षम आणि शाश्वत शहर या निकषांच्या आधारे सर्वोत्कृष्ट शहरे जाहीर करण्यात आली आहेत. काम करणाऱ्या महिलांसाठी सरकारी संस्थांची कार्यक्षमता आणि जीवनाची गुणवत्ता यासाठी उच्च मानांकन मिळवून पुण्याने या सर्वेक्षणात पाचवे स्थान मिळविले आहे.
या सर्वेक्षणात आदर्श शहरे आणि सर्वोत्तम पद्धती निश्चित केल्या जातात. तसेच त्यात शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी संस्था, धोरणकर्ते आणि व्यक्तींसाठी एक संधी उपलब्ध करून दिली जाते. ‘अवतार’च्या प्राथमिक संशोधनासोबतच सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई), जागतिक बँक, गुन्ह्यांच्या नोंदी आणि नियमित श्रमशक्ती सर्वेक्षणासह विविध विदा स्रोतांना एकत्र करून हा निर्देशांक संकलित केला जातो. ‘अवतार’च्या संशोधनात लक्ष्याधारित समूह चर्चा आणि देशव्यापी सर्वेक्षणाचा समावेश आहे. हे सर्वेक्षण फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले. त्यामध्ये ६० शहरांतील १ हजार ६७२ महिलांनी सहभाग घेतला.
हेही वाचा : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम…
या सर्वेक्षणानुसार, देशात २०२४ मध्ये बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, गुरुग्राम आणि कोईमतूर ही महिलांसाठी सर्वोत्कृष्ट दहा शहरे ठरली. याबाबत अवतार ग्रुपच्या संस्थापक-अध्यक्ष डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, ‘शहरे ही संधीचा पाया असतो. त्यामुळे महिलांची प्रगती आणि समावेशकता वाढवण्यासाठी आपल्या शहरांची मुख्य तत्त्वे आणि सांस्कृतिक जडणघडण स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. विकसित भारताचे आपले स्वप्न २०४७ पर्यंत साकार करण्यासाठी, भारतीय महिला व्यावसायिकांनी पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होणे गरजेचे आहे. महिलांना केवळ सुरक्षित रस्ते, सुलभ आरोग्यसेवा, शिक्षण आणि परवडणारी जीवनशैली देणे एवढाच याचा अर्थ नाही. ते मुख्यत्वे भरपाईचे उपाय आहेत. महिलांच्या आर्थिक यशासाठी स्पर्धात्मक क्षेत्र आणि व्यावसायिक नेतृत्व म्हणून त्यांना पुढे जाण्याच्या संधी देणेही महत्त्वाचे आहे.
हेही वाचा : नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे बंधारे पालिका का काढणार, हे आहे कारण !
इतर बाबतींतही चांगली कामगिरी
या सर्वेक्षणासाठी देशासाठी आर्थिक योगदानाच्या आधारे भारतातील १२० शहरांची निवड करण्यात आली. शहर समावेशन गुणांच्या आधारे शहरांची क्रमवारी लावण्यात आली. या सर्वेक्षणाच्या विविध निकषांमध्ये, महिलांच्या सामाजिक समावेशनामध्ये देशात चेन्नई पहिले आणि पुणे दुसरे ठरले. औद्योगिक समावेशनामध्ये पुणे पाचवे आहे. सरकारी कार्यक्षमतेमध्ये आणि जीवनाच्या गुणवत्तेच्या बाबतीतही पुण्याने चांगली कामगिरी नोंदविली आहे.
काम करणाऱ्या महिलांसाठी सर्वोत्कृष्ट शहरे
१) बेंगळुरू
२) चेन्नई
३) मुंबई
४) हैदराबाद
५) पुणे
६) कोलकाता
हेही वाचा : वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?
७) अहमदाबाद
८) दिल्ली
९) गुरुग्राम
१०) कोईमतूर