पुणे : वाहतुकीचा वेग मंदावलेल्या शहरांमध्ये पुणे जगात चौथ्या क्रमांकावर आहे, असे ‘टॉमटॉम’ या संस्थेच्या वाहतूक कोंडी अभ्यासात म्हटले आहे. वाहतूक कोंडी आणि पुणे हे समीकरण नागरिकांना नित्याचेच झाले असून, त्याचा उल्लेख यानिमित्ताने जगाच्या नकाशावरही झाला आहे.

पुण्यातील वाहनचालकांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधी लागत असल्याचे या अभ्यासात अधोरेखित करण्यात आले आहे. वाहतूक गती मंद झालेल्या शहरांमध्ये भारतातील कोलकाता, बंगळुरू या शहरांचाही पहिल्या पाचांत समावेश आहे.

हेही वाचा >>>पुणे पोलीस दलाच्या बॉम्बशोधक-नाशक पथकातील ‘तेजा’ला भावपूर्ण निरोप

‘टॉमटॉम’ ही संस्था दर वर्षी जगातील वाहतुकीचा अभ्यास करते. सन २०२४ च्या अहवालानुसार, कोलंबियातील बरानकिला हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले शहर ठरले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतातील कोलकाता, तिसऱ्या क्रमांकावर बंगळुरू आणि चौथ्या क्रमांकावर पुणे आहे. गेल्या वर्षभरातील वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, नियोजनाचा अभाव आदी प्रमुख कारणे या शहरांमधील वाहतुकीचा वेग मंदावण्यास कारणीभूत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय

दहा किलोमीटर अंतरासाठी लागणारा वेळ

बरानकिला : ३६ मिनिटे, ६ सेकंद (कोलंबिया)

कोलकाता : ३४ मिनिटे, ३३ सेकंद

बंगळुरू : ३४ मिनिटे, १० सेकंद

पुणे : ३३ मिनिटे, २२ सेकंद

लंडन : ३३ मिनिटे, १७ सेकंद

पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी बस सुविधा वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर शाश्वत उपाययोजनांची अंमलबजवाणी अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे अनेक अभ्यासात्मक उपाय सुचवले गेले आहेत. मात्र, कर्तव्यतत्परतेचा अभाव आणि उदासीनतेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी जटील बनला आहे. – रणजित गाडगीळ, संचालक, परिसर संस्था

Story img Loader