पुणे : मर्सर या उद्योगांसाठीच्या जागतिक सल्लागार संस्थेने जीवन गुणवत्ता निर्देशांक २०२३ (क्वालिटी ऑफ लाइफ इंडेक्स) नुकताच प्रसिद्ध केला. त्यात हैद्राबादनंतर पुण्याने देशात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जीवन गुणवत्ता निर्देशांकानुसार जागतिक पातळीवर पुण्याने १५४ वा क्रमांक मिळवला आहे. तर हैद्राबादने १५३वा, बेंगळुरूने १५६वा क्रमांक मिळवला. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना, स्वित्झर्लंडमधील झुरिच, कॅनडातील व्हँकुव्हर अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवन गुणवत्ता निर्देशांकात कुटुंबासह परदेशात राहून काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या जीवनाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यात आले आहे. जगभरातील पाचशेहून अधिक शहरांच्या विदावर हा निर्देशांक तयार करण्यात आला. त्यात हवामान, शाळा आणि शिक्षण, रोग आणि स्वच्छता मानके, हिंसा आणि गुन्हेगारी, भौतिक दुर्गमता, संवाद सुलभता आणि सामाजिक-राजकीय वातावरण असे घटक विचारात घेण्यात आले.

हेही वाचा – गुंडांसाठी खूशखबर!… ‘येथे’ होणार आलिशान कारागृह

यापूर्वीचा निर्देशांक २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात पुणे आणि हैद्राबाद ही दोन्ही शहर संयुक्तरित्या १४३व्या स्थानी होती. २०२२मध्ये आंतरराष्ट्रीय कर्मचार्‍यांसाठी राहण्यासाठी सर्वांत महागड्या शहरांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी’ ही क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर १२७ व्या क्रमांकासह सर्वांत महागडे भारतीय शहर ठरले होते. त्यानंतर नवी दिल्ली (१५५), चेन्नई (१७७), बेंगळुरू (१७८), हैदराबाद (१९२) आणि पुणे २०१ व्या स्थानी होते.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी : पाणीप्रश्न सुटणार, आता ‘या’ धरणातून मिळणार पाणी

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘निवास सुलभ निर्देशांक २०२३’ (इज ऑफ लिव्हिंग) या निर्देशांकात दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर २०१८ मध्ये पुण्याने अव्वल क्रमांक पटकावला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ranks second in the country in quality of life index pune print news ccp 14 ssb
Show comments