Swargate Bus Stand Rape : गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ठिकाणी पाहणी केली. तसंच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात रोज बलात्कार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने तोडफोड केली. तसंच वसंत मोरे यांनी या ठिकाणी लॉजिंग सुरु असून रोज बलात्कार होत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेचे लाइव्ह अपडेट्स आपण जाणून घेऊ.
Pune Swargate Rape Case LIVE Update बलात्काराच्या घटनेने पुणे हादरलं, शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार
पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "थेट फाशी…"
काल पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु आहे. माझं सीपींशी बोलणं झालं आहे. त्यात संशयितदृष्ट्या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे. आरोपी अजून सापडलेला नाही. पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसत आहेत. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला, असेही अजित पवार म्हणाले.
..तर छत्रपतींचं नाव घेऊ नका-शालिनी ठाकरे
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. आरोपीने तरुणीची दिशाभूल करत तिला मोकळ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असल्याची ओळख पटविण्यात आली असून पोलिसांची आठ पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. या घटनेचे पडसाद आता पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून राजकीय पक्षांनी स्वारगेट डेपोमध्ये आंदोलनही केले आहे. आता मनसेनेही या प्रकरणात भूमिका मांडली असून ‘शिवशाही’ नावाच्या बसमध्ये बलात्कार होत असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्यातील संतापजनक घटनेनंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “महाराजांच्या काळात महिलेवर अत्याचार करणार्यांचा ‘चौरंगा’ केला जायचा. आज ‘शिवशाही’ नाव असलेल्या बस मध्ये एका महिलेवर अत्याचार होतो?? लाज वाटली पाहिजे छत्रपतींच्या नावावर राजकारण करणार्यांना… माझे सरकारला आव्हान आहे, आरोपीला शोधून त्याचा ‘चौरंग’ करा नाहीतर छत्रपतींचे नाव घेऊ नका.”
“या लोकांनी चार बसेसचं लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो की याच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात. मीडियाने सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर कळेल बसेस मध्ये कंडोम पडले आहेत. आगाराच्या मागच्या बाजूला या बसेस ठेवल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी या लोकांचा हात आहे.” उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांवर, सुरक्षा रक्षकांवर वसंत मोरेंनी गंभीर आरोप केले आहेत.
आगार प्रमुखांचं निलंबन केलं पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. ३७६ क्रमांकाच्या कलमांखाली यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. बलात्कार होत असताना हे सगळे बघ्याच्या भूमिकेत होते का? आम्ही सुरक्षा केबीनची तोडफोड केली आहे. त्या समोर असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. हा विषय संवेदनशील आहे. आगाराच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या बसेस पाहिल्या तर कळेल की इथे रोज बलात्कार होत आहेत. कुणाला तरी इथे आणलं जातं आहे आणि बलात्कार केला जातो आहे. ज्या आरोपीने बलात्कार केला तो पाच दिवसांपासून स्वच्छतागृहाजवळ झोपत होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं का नाही? सुरक्षा कर्मचारी या लोकांना मॅनेज होतात का? पोलीस यंत्रणा हाकेच्या अंतरावर असली तरीही ते पोलीस स्टेशन आगाराच्या बाहेर आहे. मात्र या ठिकाणी २० सुरक्षा कर्मचारी आहेत ते काय झोपा काढतात का? ते अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे. शिवशाही या नावाखाली या लोकांनी थेट लॉजिंग तयार केलं आहे. त्या ठिकाणी साड्या पडल्या आहेत, कंडोम, कंडोमची पाकिटं पडली आहेत. अशी माहिती वसंत मोरे यांनी माध्यमांना दिली.
सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून एक्स या माय्क्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली आहे याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.
स्वारगेट ला काल झालेली घटना आज कळली ? २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला, ते पण आगराच्या आत? CCTV नुसते शो साठी आहेत का? कोणीच मॉनिटर करत नाही ? पुन्हा पुन्हा अशा घटना होतात ते बघून खूप त्रास होतो. ती मुलगी बरोबर कोणीच नव्हत? काय केले असेल एकटीने? ती आता ठीक आहे ते ऐकून थोड हायसं वाटलं.
स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार
गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे.