Pune Swargate Rape Case Accused : पुणे शहरातील स्वारगेट आगारात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला त्याच्या मूळ गावी गुणाट येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी गावात वेगळाच वाद सुरू झाला आहे. पोलिसांनी जाहीर केलेली एक लाख रुपयांची बक्षीसाची रक्कम आता गावकऱ्यांमध्ये वादाचं कारण ठरत असल्याने सरपंचांनी एक मोठा निर्णय जाहीर केलाय.

पुणे शहरापासून सुमारे ७५ किमी अंतरावर आणि शिरूरपासून २० किमी अंतरावर सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेलं गुणाट हे गाव आहे. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा याच गावचा आहे. खरंतर हा सगळं प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा गाडे हा पोलिसांपासून लपण्यासाठी आपल्या गावीच गेला होता. उसाच्या शेतातील एका खड्ड्यात गाडे लपून बसला होता आणि इथूनच त्याला अटक करण्यात आली. हा गुन्हा घडल्यानंतर जवळपास ७० तास गाडे फरार होता. लवकरात लवकर त्याचा पत्ता लागावा यासाठी पोलिसांनी टीप देणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं आणि आता गाडेला अटक केल्यानंतर याच १ लाखांवरुन गावात गोंधळ सुरू आहे.

…म्हणून आम्हाला एकही रुपया नको

गुणाटचे सरपंच रामदास काकडे यांनी सांगितले की, अनेक ग्रामस्थ गाडेला आम्ही पकडून दिलं, त्याच्यासंबंधीची माहिती आम्ही दिली असा दावा करत असल्याने ही बक्षिसाची रक्कम नक्की द्यायची कुणाला याचा गोंधळ सुरू झाला. हे टाळण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीची एक सभा घेणार आहोत, जिथे आम्ही हे जाहीर करणार आहोत की या बक्षिसाच्या रकमेचा एकही रुपया आम्हाला नकोय. ज्या ज्या लोकांनी पोलिसांना आरोपी पकडण्यात मदत केली त्यांच्याशी आम्ही बोललो असून त्यांनीही होकार दिला आहे. या घटनेमुळे गावाची बदनामी झाली आहे. ही अभिमानाची गोष्ट नाही असंही काकडे यांनी सांगितलं आहे.

गावकऱ्यांमुळे आरोपीला पकडण्यात यश

आरोपीला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांना कशी मदत केली हे सांगताना काकडे म्हणाले, “पोलिस शिक्रापूर आणि शिरूरमध्ये आरोपींचा शोध घेत असल्याचे आम्ही ऐकले. मात्र नंतर गुणाटचे नाव सर्वत्र आल्याने गावकरी चिंतेत पडले. त्यानंतर आम्ही पोलिसांना त्यांच्या शोध मोहिमेत मदत करण्याचे ठरवले. आरोपी दोन घरांमध्ये पाणी प्यायला गेला असल्याची माहिती दोन गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे त्याचे लोकेशन कळले आणि ड्रोनने त्याला शोधू शकले.”

गाडेमुळे कुटुंबीयांना त्रास

दरम्यान हे सगळं घडत असताना आणखी एका गावकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर गावातील आरोपीच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासाबाबतही खेद व्यक्त केलाय. तो (गाडे) दोषी आढळल्यास त्याला फाशी द्या. मला त्याच्याबद्दल सहानुभूती नाही. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मीडिया त्याच्या घराचे फोटो क्लिक करत इथे येत आहे. घर दाखवून काय फायदा? त्याची पत्नी, आई, मुलगा आणि आजी इथेच राहतात. मीडिया त्यांना कमेंटसाठी त्रास देत आहे, परंतु त्यांच्या वेदना कोणीही पाहत नाही”, असं म्हणत या गावकऱ्याने कुटुंबाची बाजू मांडलीये.

दुसरीकडे, पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत. तर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला आहे की, गाडेने पीडितेवर बलात्कार केला नसून दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध होते. दरम्यान, आरोपीचा चुलत भाऊ शुभम गाडे याने गाडे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. “तो घाबरला म्हणून तो दोन दिवस पळून गेला असेही शुभम गाडे म्हणाला. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे याला १२ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून पुढील सुनावणीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader