पुणे : शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळी ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात पाऊस झाल्यामुळे ऐन दिवाळीत ग्राहक, व्यापारी आणि घरी परतत असलेल्यांची तारांबळ उडाली.
मागील दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेली लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागासह कोथरुड, धायरी, शिवाजीनगर, पाषाण, डेक्कन, सहकारनगर, सिंहगड रस्ता. लोहगाव, खराडी, बिबवेवाडी, आंबेगाव, स्वारगेट परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड शहरासह आणि परिसरातही पाऊस झाला. जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागला.
हेही वाचा >>> पुणे : बालाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीमाभिंत कोसळली, मोटारीचे नुकसान; सुदैवाने जखमी नाही
दिवाळीनिमित्त रस्त्यांच्या दुतर्फा आकाश कंदील, विद्युत रोषणाईच्या माळा आणि सजावटीची दुकाने थाटली गेली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. स्वारगेट बसस्थानकावर दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना पावसापासून बचाव करण्यासाठी धावाधाव करावी लागली.
दरम्यान, मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर पुणेकरांनी ऑक्टोबर हिटचा तडाखाही अनुभवला आहे. आता ऐन थंडीच्या पाऊस, ढगाळ हवामान आणि किमान तापमानातील वाढीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे.
हडपसरमध्ये सर्वाधिक ७०.५ मिमी पाऊस
शुक्रवारी सांयकाळी ढगांच्या गडगडाटात झालेल्या जोरदार पावसाने शहर आणि परिसराला झोडपून काढले. हडपसरमध्ये सर्वाधिक ७०.५ मिमी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल पाषाणमध्ये ४५, वडगावशेरीत ३८.५, तळेगावात ३६.०, चिंचवडमध्ये ३२.५, राजगुरुनगरमध्ये ३२.०, शिवाजीनगरमध्ये २७.५, लवळेत १९.५, हवेलीत १६.०, एनडीएमध्ये १५.५ आणि मगरपट्ट्यात १०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज हलक्या पावसाचा अंदाज
पुणे शहर आणि परिसरात आज, शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सकाळी आकाश मुख्यतः निरभ्र राहील, दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवारनंतर हवामान कोरडे होऊन, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस पहाटे धुके पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.