दहीहंडीच्या निमित्ताने लावलेले ध्वनिवर्धक, ढोलताशा पथकांच्या वादनाने आवाजाची धोक्याची पातळीही ओलांडल्याचे स्पष्ट झाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात ध्वनिपातळी मोजण्यात आली. त्यात दहीहंडी फोडण्यासाठी गोविदांकडून थरावर थर चढवतानाच ध्वनिपातळीमुळे अक्षरशः ‘थरथराट’ झाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा >>> Dahi Handi 2023: सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुपने फोडली
सीओईपी विद्यापीठाचे विद्यापीठाचे डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत नांदोडे, इंद्रजित देशमुख यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात ध्वनिपातळीच्या नोंदी घेतल्या. त्यात शिवाजीनगर गावठाण येथे ९२.८, संभाजी उद्यान चौक येथे १०५.२, गरवारे चौक येथे १०३.४, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला येथे १००.२, साहित्य परिषद चौक येथे १०४.४, स. प. महाविद्यालय चौक येथे १०३.५, सदाशिव पेठ येथे ९५.२, नारायण पेठ ११०.५, बाजीराव रस्ता येथे १०८.३, शनिवारवाडा येथे ९३.२ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली. औद्योगिक क्षेत्रासाठी ७५ डेसिबल कमाल ध्वनिपातळी सर्वोच्च मानली जाते. तर रहिवासी क्षेत्रासाठी रात्री ४५ डेसिबल ध्वनिपातळी अपेक्षित असते. मात्र उत्सावाच्या नादात या ध्वनिपातळीचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळेच उच्चांकी ध्वनिपातळी नोंदवली गेली. या उच्चांकी ध्वनिपातळीमुळे नागरिकही हैराण झाले.