पुणे : पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेची वाढ करोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांकडून मोठ्या घरांना मागणी वाढल्याने विकसकांकडून अशा गृहप्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. पुण्यात गेल्या सहा वर्षांत घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक ३७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती असल्याचे समोर आले आहे.
अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात पुणे, मुंबईसह दिल्ली, कोलकता, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या महानगरांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षांत म्हणजेच २०१९ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत घरांच्या किमतीत झालेल्या वाढीचा आढावा यातून घेण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशात घरांच्या किमतीत सर्वाधिक ६९ टक्के वाढ बंगळुरूतील गुंजूर भागात झाली आहे. गेल्या सहा वर्षांत येथे घरांच्या सरासरी किमती प्रतिचौरस फूट ५ हजार ३० रुपयांवरून ८ हजार ५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत.
हेही वाचा >>> मार्केट यार्डातील बँकेत सुरक्षारक्षकाला चाकूच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा
पुण्याचा विचार करता वाघोली परिसरात घरांच्या किमतीत सर्वाधिक ३७ टक्के वाढ झाली आहे. वाघोली परिसरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांची कार्यालये मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत वाघोलीमध्ये घरांच्या सरासरी किमती प्रतिचौरस फूट ४ हजार ८२० रुपयांवरून ६ हजार ६०० रुपयांवर गेल्या आहेत. याच वेळी पुण्यात गृहप्रकल्पांसाठी सर्वाधिक पसंती वाकड भागाला आहे. गेल्या सहा वर्षांत वाकडमध्ये घरांच्या सरासरी किमतीत २७ टक्के वाढ झाली आहे. या भागात घरांच्या सरासरी किमती प्रतिचौरस फूट ६ हजार ५४० रुपयांवरून ८ हजार ३०० रुपयांवर गेल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पिंपरी : ताबा घेण्याच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की
मुंबईत पनवेलमध्ये सर्वाधिक वाढ
मुंबई महानगर क्षेत्रात पनवेलमध्ये गेल्या सहा वर्षांत घरांच्या किमतीत सर्वाधिक ५८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत पनवेलमध्ये घरांच्या किमती प्रतिचौरस फूट ५ हजार ५२० रुपयांवरून ८ हजार ७०० रुपयांवर गेल्या आहेत. मुंबईत वरळीला सर्वाधिक पसंती आहे. गेल्या सहा वर्षांत वरळीत घरांच्या सरासरी किमतीत ३७ टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षांत वरळीत घरांच्या किमती प्रतिचौरस फूट ३८ हजार ५६० रुपयांवरून ५३ हजार रुपयांवर गेल्या आहेत.
देशातील महानगरांमध्ये घरांच्या सरासरी किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याच वेळी महानगरांभोवतालच्या भागांमध्ये घरांच्या किमती वेगाने वाढत आहेत. शहरातील मुख्य भागापेक्षा उपनगरी भागांमध्ये घरांच्या किमतीत गेल्या सहा वर्षांत जास्त वाढ झालेली आढळून येत आहे. – संतोष कुमार, उपाध्यक्ष, अनारॉक ग्रुप