पुणे : राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल १५० रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ५९ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यात जेएन.१ चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक ५९ रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १५० असून, राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत. त्याखालोखाल नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, ठाणे ७, जळगाव ४, अहमदनगर ३, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे.

हेही वाचा >>>शरद मोहोळ हत्या प्रकरण : माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण- स्वाती मोहोळ

राज्यात मागील २४ तासांत करोनाच्या ६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याच वेळी ७० रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के असून, मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात मागील २४ तासांत २ हजार ७२८ चाचण्या झाल्या. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर २.२३ टक्के आहे. राज्यात एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद मागील २४ तासांत झालेली नाही, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.

पुण्यातील करोना चाचण्यांची संख्या जास्त आहे. याच वेळी जनुकीय क्रमनिर्धारणासाठी सर्वाधिक नमुने पुण्यातून पाठविले जात आहेत. त्यामुळे राज्यात जेएन.१चे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. असे असले, तरी करोनाचा जेएन.१ हा उपप्रकार फारसा धोकादायक नसून तो सौम्य स्वरूपाचा आहे.- डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune recorded the highest number of patients of the new subtype of corona virus jn1 in the state pune print news stj 05 amy
Show comments