पुणे शहरात बुधवारी दिवसभरात १३३ मिमी पाऊस पडला. हा एका दिवसातील (२४ तास) आजवरचा शहरात पडलेला उच्चांकी पाऊस आहे. यापूर्वी २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिमी पाऊस शहरात पडला होता. त्या खालोखाल २६ सप्टेंबर १९७१ रोजी ११५.३ मिमी, १९ सप्टेंबर १९८३ रोजी ११०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.  हवामान बदलासह विविध कारणांमुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

शहर आणि उपनगरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी (२६ सप्टेंबर) पावसाचा जोर कमी झाला. दुपारनंतर तुरळक सरी पडल्या. दिवसभरात शिवाजीनगरमध्ये फक्त चार मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव

हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला गुरुवारी नारंगी इशारा दिला होता. जोरदार पावसाचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरवली. दिवसभरात फारसा पाऊस पडला नाही. दुपारनंतर एक, दोन हलक्या सरी पडल्या. शहराच्या उपनगरात आणि पिंपरी – चिचवड परिसरातही हलक्या सरी पडल्या.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरमध्ये ४.१, पाषाणमध्ये ३.८, चिंचवडमध्ये ३.० आणि लवळेत ४.५ मिलीमीटर पाऊस पडला. हवामान विभागाने शुक्रवारसाठी शहराला पिवळा इशारा दिला असून, हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणारी टोळी गजाआड, १७ गुन्हे उघड; १५ लाखांचा ऐवज जप्त

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा काहीसा जोर होता. भोरमध्ये १६.०, गिरीवन (मुळशी) १३.५, लोणावळ्यात १२.५, नारायणगावात १०.५ आणि लवासात ४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजवरचा उच्चांकी पाऊस (२४ तास, मिमी)

२५ सप्टेंबर २०२४ – १३३ मिमी

२१ सप्टेंबर १९३८ – १३२.३ मिमी

२६ सप्टेंबर १९७१ – ११५.३ मिमी

१९ सप्टेंबर १९८३ – ११०.७ मिमी