पुणे : राज्यात महावितरणच्या पुणे विभागामध्ये वीजग्राहकांची सर्वाधिक नोंद झाली असून, ३९ लाख १७ हजार ७०१ ग्राहकांना वीजसेवा देण्यात आली आहे. वीजजोडणी देण्यामध्येही पुणे विभाग अग्रेसर राहिला असून, गेल्या दोन वर्षांत ४ लाख ३४ हजार इतक्या विक्रमी वीजजोडण्या दिल्या आहेत. नवीन वीजजोडणी, वीजबिलांचे अचूक बिलिंग, वीजहानीतील घट या उपाययोजनांमुळे वार्षिक महसुलात ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी ही माहिती दिली. पुणे विभागात पुणे, बारामती आणि कोल्हापूर या उपविभागांचा समावेश आहे. रास्ता पेठेतील ‘प्रकाशदूत’ सभागृहामध्ये पुणे विभागाच्या वार्षिक आढावा बैठकीत पवार यांनी ग्राहकसेवेसह गेल्या तीन आर्थिक वर्षांतील विविध कामांचा आढावा घेतला. या वेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, संजीव नेहेते आणि अनिल घोगरे, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत, शीतल निकम आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षांत पुणे विभागामध्ये शंभर टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजनांना गती देण्यात आली. वीजबिल वसुलीची कार्यक्षमता वाढल्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील १२४ कोटींची थकबाकी सन २०२४-२५ अखेर ६९ कोटींवर आली आहे. गेल्या दोन वर्षांत ६२ कोटी ४० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. वीजहानी टाळण्यासाठी आणि अचूक बिलिंगसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वीज वितरणाच्या हानीमध्ये ०.३६ टक्के, लघुदाब वीजहानीत ०.९६ टक्के तसेच तांत्रिक व वाणिज्यिक हानीमध्ये ०.३२ टक्के घट झाली. सध्या विभागाच्या तांत्रिक व वाणिज्यिक हानीचे प्रमाण ७.६९ टक्के आहे. त्यामुळे विभागाचा वार्षिक महसूल २१ हजार २८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.’
सूर्यघरांच्या ऊर्जेत पुण्याचा वाटा सर्वाधिक
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला गती देऊन छतावरील सौरऊर्जेच्या स्थापित क्षमतेत राज्यात सर्वाधिक १५ टक्के वाटा पुणे विभागाने उचलला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ हजार ९७७ ग्राहकांकडे छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता २४९ मेगावॅट होती. यंदा मार्चअखेर २८ हजार ६०४ ग्राहकांकडे ही क्षमता राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅट झाली आहे, अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली.
दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवा, महसूलवाढ आणि वीजबिलांची शून्य थकबाकी या त्रिसूत्रींच्या आधारे गेल्या दोन वर्षांत काम करण्यात आले. अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुणे विभागाने चांगली कामगिरी केली आहे. या त्रिसूत्रीनुसार आगामी काळातही कामकाज केले जाणार आहे.- राजेंद्र पवार,मुख्य अभियंता, पुणे विभाग