लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस आणि बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यांमुळे शहर परिसरातील हवेत आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यात भर म्हणून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्यामुळे पुण्यासह राज्यभरात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. सकाळी आणि सायंकाळी तापमान कमी झाल्याच्या काळात हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे तापमान कमी असतानाही म्हणजे रात्री, पहाटे आणि सायंकाळीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
आणखी वाचा-राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज होता. पण, गुरुवारी पुन्हा हडपसर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क येथील पारा ४३ अंशांच्या वर गेला होता. हडपसरमध्ये सर्वाधिक ४३.५, वडगाव शेरीत ४३.१, कोरेगाव पार्कमध्ये ४३.०, मगरपट्ट्यात ४२.४, लवळेत ४१.८, पाषाण, शिवाजीनगरमध्ये ४१.०, एनडीएत ४०.९ आणि हवेलीत ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
पारा ४३ अंशांच्या वर
पुणे शहर आणि उपनगरात यंदाच्या एप्रिल महिन्यांत मागील अकरा वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. २०१३ पासून २०२३ पर्यंत पुण्यात एप्रिल महिन्याचे तापमान सरासरी ३७ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे. २०१९ मध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस २७ एप्रिल रोजी एकदाच पारा ४३.० अंशांवर गेला होता. त्यानंतर यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाच-सहा दिवस उपनगरात पारा ४३ अंशांच्या वर राहिला आहे. प्रामुख्याने वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, लवळे, हडपसर आदी ठिकाणी पारा ४३ अशांच्या वर गेल्याचे दिसून येत आहे.