पुणे : शहर आणि परिसरात गुरुवारी ही किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहिला. राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली. शिवाजीनगरमध्ये ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवेत दिवसभर गारठा राहिल्याने पुणेकरांना हुडहुडी भरली होती.
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर गुरुवारीही कमाल आणि किमान तापमानात घट झाली. बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात ०.७ आणि किमान तापमानात २.५ अंश सेल्सिअसने घट होऊन कमाल तापमान २९.७ तर किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
हेही वाचा >>> साथरोगांचा धोका आता वेळीच समजणार! केंद्र सरकारकडून पुण्याची महानगर सर्वेक्षण केंद्रासाठी निवड
शहरात एनडीए परिसरात ७.६, हवेलीत ७.८ आणि शिवाजीनगरमध्ये ८.६ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. दुपारी तासभर उन्ह पडल्यानंतर पुन्हा हवेत गारठा वाढला होता. शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या विविध भागांत किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. शिरुरमध्ये ७.४, माळीणमध्ये ७.८, बारामतीत ८.७, दौंडमध्ये ९.२, राजगुरुनगरमध्ये ९.४, नारायणगाव आणि आंबेगावात १०.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे किमान तापमानात घट होऊन थंडी वाढत असतानाच दुसरीकडे लवळेत १७.०, वडगावशेरीत १७.०, लोणावळ्यात १६.२, मगरपट्ट्यात १५.६ आणि चिंचवडमध्ये १४.९ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.