पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस अचानक बंद पडण्याचे प्रमाण (ब्रेक डाऊन) २०२३ च्या तुलनेत गेल्या वर्षभरात घटले आहे. २०२३ मध्ये १७,७८४ बस अचानक बंद पडण्याच्या घटना घडल्या होत्या, तर २०२४ मध्ये १५,७१९ बस अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्या. पीएमपी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील उपनगरांपर्यंत पीएमपी बस जाते. पीएमपीमधून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. अचानक बस बंद पडणे, तांत्रिक बिघाड, अपघात, अनुचित प्रकारांमुळे प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यास विलंब होतो. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी १७,७८४ बस अचानक बंद पडण्याच्या घटना घडल्या. पीएमपी प्रशासनाने दुरुस्ती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्यानंतर बस बंद पडण्याचे प्रमाण दोन हजारांनी कमी झाले. त्यामुळे २०२४ मध्ये १५,७१९ बस बंद पडल्या. तसेच, केंद्र सरकारच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या ३२७ बस तातडीने सेवेतून काढून टाकण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. पीएमपीने बस अचानक बंद पडण्याबाबत तातडीने तोडगा काढावा, प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असल्याची प्रतिक्रिया पीएमपी प्रवासी मंचाच्या जुगल राठी यांनी दिली.
पीएमपीच्या ताफ्यातील बस दुरुस्तीबाबत नियोजन करण्यात आले आहे. आयुर्मान संपलेल्या ३२७ बस येत्या वर्षभरात सेवेतून काढून टाकण्यात येतील. नव्याने पर्यावरणपूरक आणि सुलभ प्रवासाच्या दृष्टीने आधुनिक बस ताफ्यात घेतल्या जाणार आहे. त्यामुळे बस बंद पडण्याच्या घटनांमध्ये आणखी घट होईल. – नितीन नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी