पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाचे काम प्रलंबितच आहे. इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी भाषा केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठामध्ये काही वर्षांपूर्वी मराठी भाषा भवन प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, बराच काळ हे काम प्रलंबित राहिले होते. मराठी भाषा भवनासाठी बराच काळ पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुढील काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी मराठी भाषा भवनाच्या अनुषंगाने समिती नियुक्त केली. त्यात ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. राजेश्वरी देशपांडे यांचा समावेश होता. समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. त्यानुसार मराठी भाषा भवनांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. समितीने अंतरिम अहवालात १५ ते १६ उपविभाग सुचवले आहेत. त्यात पाठ्यपुस्तकनिर्मिती, कोशनिर्मिती, अनुवाद, शालेय ते उच्च शिक्षणातील शिक्षकांना प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठीची पाठ्यपुस्तके, बोली भाषांचा अभ्यास, मराठी भाषा संग्रहालय, प्रयोगशाळा अशा घटकांचा समावेश होता. मराठीमध्ये ज्ञाननिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार मराठी भाषा भवनात मराठी भाषा केंद्र स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे भाषा आणि साहित्य प्रशालेचे संचालक प्रा. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.

मराठी भाषा भवनाच्या उर्वरित कामाला गती देण्यात आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत थांबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठात पाली, प्राकृत भाषा विभागही असल्याने मराठी भाषा केंद्र उत्तम पद्धतीने काम करू शकेल. हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी नमूद केले.

Story img Loader