पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशानुसार पुणे शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट -एचएसआरपी) बसवून घेण्यासाठी पुणेकरांचा अल्प प्रतिसाद असल्याचे समोर आले आहे. शहरात २५ लाख जुनी वाहने असून, आतापर्यंत केवळ ५ हजार वाहनधारकांनी आधुनिक नंबर प्लेट बसवून घेतल्या आहेत. संबंधित वाहनचालकांनी ३१ मार्च पूर्वी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवून घ्यावी. अन्यथा एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘आरटीओ’ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘आरटीओ’च्या आकडेवारीनुसार पुणे शहरात डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणीकृत ४० लाख दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. त्यापैकी २५ लाख वाहने ही सन २०१९ पूर्वीची असून, या वाहनांना सुरक्षिततेच्या अनुषंगाने आधुनिक नंबर प्लेट बसवून घेण्याबाबत सूचना ऑक्टोबर महिन्यात ‘आरटीओ’कडून करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर केवळ पाच हजार जुन्या वाहनधारकांनी वाहनांच्या जुन्या नंबर प्लेट बदलून, आधुनिक नंबर प्लेट बसविल्या आहेत, तर १५ हजार वाहनधारकांनी ऑनलाइन संकेतस्थळावर नोंदणी केली आहे, अशी माहिती पुणे आरटीओ अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाले, ‘जुन्या वाहनांना आधुनिक नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात अनिवार्य करण्यात आले असून, त्यासाठी ‘रोझ माटा सेफ्टी सिस्टीम’ या खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी करून वाहनधारकाला वेळ घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ९० दिवसांत नंबर प्लेट बदलून देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे शहरातून तीन विशेष विभाग तयार करण्यात आले असून, ६९ केंद्रे उभारण्यात आली आहेत.’ पुणे शहरात २५ लाख जुनी वाहने आहेत. आतापर्यंत केवळ पाच हजार वाहनधारकांकडून उच्च सुरक्षा क्रमांकाची प्लेट बसवण्यात आली आहे.
वाहन नोंदणीचे दर
दुचाकी, ट्रॅक्टर ४५० रुपये
तीनचाकी ५०० रुपये
कार, बस, अवजड वाहने ७४५ रुपये
नोंदणीसाठी सुविधा
वाहनधारकांना नोंदणी करण्यासाठी https:// transport. maharashtra. gov. in हे ऑनलाईन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘एचएसआरपी न्यू’ हे कळफलक दाबून जिल्हा निवडून जुन्या वाहनांची नोंदणी आणि वाहन तपासणीसाठी वेळ निश्चित करावी. त्यानंतर ऑनलाइन माध्यमातूनच शुल्क भरावे. मदतीसाठी ७८३६८८८८२२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.