पुणे : कोथरूड येथील थोरात उद्यानात खुली व्यायामशाळा, योग केंद्र, विरंगुळा केंद्र, वाॅकिंग ट्रॅक, डायनासोर पार्क यासाठी बांधकाम केल्यानंतर आता प्रस्तावित मोनो रेल प्रकल्पासाठी उद्यानात मोठ्या प्रमाणावर खांब उभारण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी उद्यानात बांधकाम करण्यात येणार असल्याने मोनो रेलला उद्यानप्रेमींकडून विरोध सुरू झाला आहे. दहा फूट उंचीवरून जाणाऱ्या मोनो रेलसाठी सुमारे सत्तर खांबांची उभारणी उद्यानात करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात चालायचे कसे? असा प्रश्न उद्यानप्रेमींकडून उपस्थित करण्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पाविरोधात स्थानिक एकवटले आहेत. उद्यानातील हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थोरात उद्यान हे कोथरूड परिसरातील मोठे आणि प्रशस्त उद्यान आहे. उद्यानाचे क्षेत्र १६ हजार चौरस मीटर एवढे असून या उद्यानामध्ये ७२ व्होल्ट डिसी बॅटरी ऑपरेटेड मोनोरेल उभारण्यात येणार आहे. दोन डब्यांची ही मोनोरेल असून त्यासाठी ४१० आरएमटी ट्रॅक, सुरक्षा रेलिंग, प्लॅटफाॅर्म तिकीट कक्षासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम कोलकाता येथील ब्रॅथवेट कंपनीला देण्यात आले असून पुढील महिन्याभरात मोनोरेलेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. थोरात उद्यानात यापूर्वी डायनासोर पार्क, कारंजे, खुली व्यायामशाळा, योग आणि विरंगुळा केंद्रासाठी बांधकाम करण्यात आले आहे. त्यातच आता मोनो रेल्वेची भर पडणार आहे. डायनासोर पार्कचे काम झाले असले तरी तो कार्यान्वित झालेला नाही. मात्र या बांधकामामुळे उद्यानाचे क्षेत्र व्यापण्यात आले आहे. उद्यानात अनेक जण सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, व्यायासामाठी येत असतात. मात्र दहा फूट उंचीवरून मोनो रेल जाणार असल्याने आणि सुमारे ७० खांब उद्यानात उभारण्यात येणार असल्याने या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध सुरू झाला आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांना सहजपणे मिळणार इंटर्नशिप! विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये आता इंटर्नशिप सेल!

विरोधाची कारणे काय?

या प्रकल्पाच्या कामामुळे धूळ निर्माण होणार असून श्वसनाचे विकार होण्याचा धोका आहे. उद्यानाचे क्षेत्र कमी होणार असून पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. शहरातील विविध उद्यानातील फुलराणी प्रकल्पांची दुरवस्था झाली असताना मोनो रेलचा घाट कशासाठी असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरण, मेट्रो प्रकल्पाची कामे, परिसरात होणारी बांधकामे यामुळे व्यायामासाठी पदपथांवरून चालणे अडचणीचे ठरत आहे. यापूर्वीच उद्यान विविध प्रकल्पांनी पूर्ण असतानाही स्थानिकांची कोणतीही मागणी नसताना मेट्रोचा घाट घातला जात असल्याने त्याला विरोध होत आहे. थोरात उद्यानाजवळूनच काही मीटर अंतरावर मेट्रो मार्गिका आहे. त्यामुळे मोनो रेलची गरज नाही, असा दावाही करण्यात आला आहे.

हेही वाचा : महिला उद्योजकांना पाठबळ! एमसीसीआयएचे खास महिलांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवून त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली होती. त्याचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार, उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांना देण्यात आले आहे. तसेच निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनाही देण्यात येणार आहे. उद्यानातील मोनो रेल प्रकल्पाला विरोध आहे. उद्यान सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. मोनोरेल फिरू शकेल, एवढी जागाही उद्यानात शिल्लक नाही. नागरिकांच्या चालण्याची हक्काची जागा मोनो रेल व्यापणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune residents oppose monorail project in thorat garden of kothrud pune print news apk 13 css