पुणे : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात वनविभागाच्या वतीने राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रासलँड सफारी’ उपक्रमाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमातून स्थानील ग्रामस्थांना कमाई झाली असून वनविभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे. त्यासोबतच पर्यटकांना वन्यजीव सृष्टीची माहिती मिळाली.
पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात ग्रासलँड सफारी सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी आणि बारामती तालुक्यातील शिरसुफळ येथे सुरू करण्यात आलेल्या सफारीने पर्यटकांना वन्यजीवांचे जवळून दर्शन घडविले. या अभयारण्यात लांडगे, हायना, चिंकारा, भारतीय कोल्हे यांच्यासह गवताळ प्रदेशातील पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि वन्यप्रेमींसाठी हे पर्यटन केंद्र झाले आहे.
हेही वाचा…वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सरसावले !
वर्षभरात अनेक पर्यटकांनी या सफारीचा आनंद लुटला. वनविभागाने वर्षभरात तीन हजार ४४ सहलींचे आयोजन केले होते. त्यामुळे स्थानिक परिसरातील ३० कुटुंबांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा झाला. निसर्ग मार्गदर्शकांनी १५ लाख २२ हजार रुपयांची कमाई केली. तर, वनविभागाने अतिरिक्त १९ लाख ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. या उपक्रमातून ३४ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा महसूल मिळाला. यामध्ये एकट्या कडबनवाडीने उत्पन्नात ७५ टक्के योगदान दिले आहे.
या उपक्रमाने प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकांना सातत्यपूर्ण रोजगार तर उपलब्ध करून दिलाच आहे. पण, त्याबरोबरीने राज्यात इतर ठिकाणी पर्यावरण पर्यटनाचे आदर्श प्रारूप विकसित केले आहे.
हेही वाचा…परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर, गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांची निवड
गवताळ प्रदेशातील सफारी हे जीवसृष्टीचे संवर्धन आणि उपजीविका निर्मितीचे उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे. गेल्या वर्षभरात गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ‘इको टुरिझम’ला भरारी मिळाली आहे. एन. आर. प्रवीण, वनविभागाचे अधिकारी