पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी बंद करण्यात यावी, या मागणीसाठी पुणे शहरातील हजारो रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. राज्य सरकारने रिक्षा चालकांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बाइक टॅक्सी विरोधी आंदोलन समितीने दिला आहे.
या ठिय्या आंदोलनात शहरातील विविध रिक्षा संघटना सहभागी झाल्या असून प्रवासी सेवा बंद केली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. यावेळी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर म्हणाले की, शहरातील रिक्षा चालकांना घर वैगरे काही नको, आम्हाला केवळ आमच भाड आम्हाला मिळव. मात्र मागील आठ वर्षापासून ऑनलाईन बुकींग सुरू झाल्याने रिक्षा चालकाचा हातचा रोजगार गेला आहे.अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून आता बाइक टॅक्सी सेवा सुरू झाली आहे.यामुळे आम्ही जगायच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आज आम्ही शहरातील विविध संघटना एकत्रित येत प्रवासी सेवा बंद ठेवली आहे.या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा भविष्यात अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.