पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ‘रिंग रोड’ची कनेटिव्हिटी वाढविण्यात येणार आहे. या रिंग रोडला जोडणारे पंधरा महत्त्वाचे इंटरचेंज विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी १४५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. ‘पीएमआरडीए’चे भौगोलिक क्षेत्रफळ ६ हजार २४६.२६ चौरस किलोमीटर एवढे असून, त्यामध्ये ९ तालुके आणि ६९७ गावांचा समावेश आहे. त्यानुसार पुणे आणि परिसरातील दळणवळण गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांसाठी ‘पीएमआरडी’ने त्यांच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुदी केल्या आहेत. नियोजित वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड), पुणे-सातारा आणि पुणे-नगर रस्त्यापासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच, ‘रिंग रोड’ला जोडणारे १५ इंटरचेंज विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेअंतर्गत चांदखेड ते कासारसाई, मुठा टाॅप ते उरावडे आणि निघोजे ते मोई या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्याअंतर्गत तीन नवे रस्ते बांधण्याचे नियोजित आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ‘रिंग रोड’ प्रस्तावित आहे. गतिमान दळणवळणाच्या दृष्टीने त्याला गती देण्यात येणार आहे. मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा आणि मुळशी या नऊ तालुक्यामधून प्रस्तावित रिंग रोड जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन इंटरचेंज तयार करण्याचे नियोजित आहे. एकूण १५ ‘इंटरचेंज’मध्ये १२ इंटरचेंज यापूर्वीच अस्तित्वात आहेत. तर तीन नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत एकूण १२.१० किलोमीटर लांबीचे रस्ते ‘रिंग रोड’शी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होऊन दळणवळणाची गती वाढेल, असा दावा ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला आहे.

नव्याने उभाण्यात येणारे इंटरचेंज

रस्त्याचे नावअंतरखर्च
मूठा नदी टाॅप ते उरावडे३.५ किलोमीटर१९.२५ कोटी
चांदखेड ते कासारसाई५ किलोमीटर५० कोटी
निघोजे ते मोई३.६ किलोमीटर७५ कोटी

१.२६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर क्षेत्रासाठीचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या एकात्मिक आराखड्यात पुरंदर विमानतळापर्यंतचा ‘कनेक्ट’ वाढविण्यासाठी मेट्रो मार्गिका, पीएमपीचे नवे मार्ग, पीएमपीचे टर्मिनल, रेल्वे जोड मार्गिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

‘रिंग रोड’ला जोडणारे १५ ‘इंटरचेंज’ विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात मंजुरी घेण्यात आली असून, त्यासाठी १४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Story img Loader