पुणे स्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाडय़ांची संख्या व पर्यायाने प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. पुणे स्थानकाला विस्तारासाठी जागेची मर्यादा असल्याने सध्या असलेल्या स्थानकाचा विस्तार शक्य नाही. त्यामुळे यापुढे नव्या गाडय़ा वाढविण्यावरही मर्यादा येणार आहेत. पुण्याजवळ पर्यायी स्थानक झाल्यास हा प्रश्न सुटू शकणार आहे. हडपसर येथे हे स्थानक उभारण्याचे नियोजन आहे, मात्र त्यासाठी जागेचा तिढा कायम असल्याने पुणे रेल्वेच्या विस्ताराला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर अगदी काही वर्षांपूर्वी पन्नास ते साठ गाडय़ांची ये-जा होती. त्या वेळची गरज लक्षात घेता स्थानकातील प्रवाशांसाठीच्या विविध व्यवस्था पुरेशा होत्या. मागील काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या गरजेनुसार गाडय़ांची संख्या वाढत गेली. त्या प्रमाणात सुविधांमध्येही वाढ झाली असली, तरी सद्य:स्थिती लक्षात घेता काही प्रमाणात सुविधा कमी पडताना दिसतात. मालगाडय़ा वगळता स्थानकात पुणे-लोणावळा लोकलच्या ४४ फेऱ्यांबरोबरच इतर १८० गाडय़ांची स्थानकात ये-जा आहे. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही झपाटय़ाने वाढली आहे.
भविष्यात रेल्वे सेवेचा विस्तार करायचा झाल्यास त्यासाठी पुणे स्थानकावर दोन्ही बाजूला जागा नाही.प्रवाशांची संख्या वाढतच राहिल्यास व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे मध्य रेल्वेकडून पुणे स्थानकाच्या जवळच पर्यायी टर्मिनल उभारण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला खडकी स्थानकाच्या विस्ताराचा विचार झाला, मात्र तेथेही पुरेशी जागा नसल्याने हडपसरमध्ये पर्यायी टर्मिनल उभारण्याचे नियोजन करण्यात आले. या ठिकाणी टर्मिनल उभारल्यास पुणे-लोणावळा व भविष्यातील पुणे-दौंड या लोकलसेवा तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडय़ा या टर्मिनलवरून सोडण्यात येऊ शकतात.
हडपसर येथील टर्मिनलसाठी सर्वात मोठी अडचण जागा मिळविणे हीच आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी चाळीस एकराहून अधिक जागा लागणार आहे. मात्र, ही जागा मिळविणे एक दिव्यच आहे. बहुतांश जागा शेतकऱ्यांच्या आहेत. त्याचप्रमाणे, जागेचा सध्याचा बाजारभाव लक्षात घेता जागा मिळविण्यासाठीच कित्येक कोटींचा खर्च करावा लागणार आहे. ही जागा मिळणे अवघड असल्याचे काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. त्यामुळे अद्याप या प्रकल्पाचे काम एक टक्काही पुढे जाऊ शकलेले नाही. त्यामुळे एकूणच पुणे रेल्वेच्या विस्ताराला ब्रेक लागला आहे. पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिहेरीकरणाचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. पुणे रेल्वेला हा एकच आशेचा किरण आहे. त्यामुळे पुणे- मुंबई मार्गावर गाडय़ांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठीही पुन्हा विस्तारित जागेची आवश्यकता लागणार आहे.
पुणे रेल्वेच्या विस्ताराला ‘ब्रेक’!
हडपसर येथे पर्यायी स्थानक उभारण्याचे नियोजन आहे, मात्र त्यासाठी जागेचा तिढा कायम असल्याने पुणे रेल्वेच्या विस्ताराला ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे.
First published on: 08-08-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rly expantion