रेल्वेच्या पुणे विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या मालाच्या वाहतुकीमध्ये साखरेच्या वाहतुकीमध्ये मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १९३ मालगाडय़ा साखरेची वाहतूक पुणे विभागाने केली असून, त्यातून विभागाला सुमारे ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सर्व साखरेची वाहतूक पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांतून करण्यात आल्याने या उत्पन्नाच्या रुपाने या साखरेचा गोडवा पुणे रेल्वेला मिळाला आहे.
मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने प्रवाशांना विविध सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच मालाच्या वाहतुकीवरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मालाच्या वाहतुकीतून मिळणारे उत्पन्नही वाढले आहे. माल वाहतुकीमध्ये सिमेंटच्या बरोबरीने साखरेने वरचा क्रमांक पटकावला आहे. पुणे विभागातील मालवाहतुकीच्या उत्पन्नामध्ये साखरेचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे. विभागामध्ये कोल्हापूर, सातारा, बारामती या रेल्वे स्थानकावरून साखरेच्या मालगाडय़ा भरल्या जातात. ही साखर राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी पाठविण्यात येते.
यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत या स्थानकावरून १९३ मालगाडय़ा भरून साखरेची वाहतूक करण्यात आली. त्यातून विभागाला ७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ११५ मालगाडय़ा साखरेची वाहतूक करण्यात आली होती. त्यातून ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ही आकडेवारी पाहता साखरेच्या वाहतुकीतून विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. साखरेच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या वतीने काही प्रमाणात सूट देण्यात येत असल्यानेही रेल्वेच्या माध्यमातून साखरेची वाहतूक करण्याकडे व्यापारी व कारखान्यांचा ओढा वाढला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेच्या प्रवासी व माल वाहतुकीतील उत्पन्नाने मागील वर्षी एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्याल मालवाहतुकीतून मिळणारे उत्पन्न सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे आहे. पुणे विभागामध्ये साखरेचा वाटा त्यात मोठा आहे. यंदा चारच महिन्यात एकूण मालवाहतुकीतून विभागाला ११६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यात साखरेचा वाटा ७२ कोटी रुपयांचा असल्याने पुणे विभागासाठी सध्या साखरेची वाहतूक महत्त्वाची ठरत आहे. साखरेच्या या वाढत्या वाहतुकीबाबत पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, मिलिंद देऊस्कर, वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा यांनी समाधान व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा