पुणे : शहरातील रस्त्यांवरील खाली-वर झालेली ड्रेनेज चेंबरची झाकणे दुरुस्त करून समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने गेल्या महिन्यात मोहीम राबविली. त्यामध्ये शहरातील विविध भागांतील ४०७ चेंबर समपातळीवर आणले. मात्र, सध्या ‘मिशन १५’अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे अनेक रस्त्यांवरील चेंबरची झाकणे खड्ड्यात गेली असून, ही झाकणे वर काढण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे.

रस्त्यांवरील ड्रेनेजच्या चेंबरची झाकणे खाली-वर असल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चेंबरची झाकणे वर-खाली असल्याने खड्डा तयार होऊन वाहनचालकांचे अपघात होतात. याशिवाय पाठदुखी, कंबरदुखी अशा त्रासाचाही वाहनचालकांना सामना करावा लागतो. ही झाकणे रस्त्याच्या पातळीवर आणण्यासाठी गेल्या महिन्यात महापालिकेच्या पथ विभागाने मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये शहरातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांवरील सुमारे ४०७ चेंबर समपातळीवर आणण्यात आले. मात्र, सध्या महापालिकेच्या पथ विभागाने सुरू केलेल्या ‘मिशन-१५’ उपक्रमामुळे या १५ रस्त्यांचे पुनर्डांबरीकरण करताना बहुतेक रस्त्यांवरील चेंबरची झाकणे पुन्हा खड्ड्यात गेली आहेत.

हेही वाचा – पुणे महापालिकेत आता अत्याधुनिक संकट व्यवस्थापन कक्ष, काय आहे कारण ?

डांबरीकरणामुळे झाकली गेलेली चेंबरची झाकणे खोदण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाचा मनमानी कारभार समोर आला आहे. शहरातील रस्त्यावर असलेली चेंबरची झाकणे रस्त्याच्या समपातळीत नाहीत. काही ठिकाणी खाली, तर काही ठिकाणी रस्त्याच्या वर गेली आहेत. त्यामुळे अनेक चेंबरभोवती खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. वारंवार तक्रारीनंतर महापालिकेच्या पथ विभागाने चेंबरच्या झाकणांची आणि त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यांची माहिती गोळा करत शहरातील विविध रस्त्यांवरील सुमारे ४०० पेक्षा अधिक चेंबर रस्त्याच्या समपातळीस आणण्याची कामे केली.

ही कामे सुरू असतानाच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांबरोबर बैठक घेत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील महत्त्वाचे प्रमुख १५ रस्ते पूर्णपणे रीसरफेसिंग करण्यासोबत रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याच्याही सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने ‘मिशन १५’अंतर्गत प्रमुख १५ रस्त्यांच्या डांबरीकरणासह इतर महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा – काँग्रेस भवनला ‘जाग’ येणार कधी?

रस्त्यांचे डांबरीकरण करताना पथ विभागाने रस्ते खरवडून त्यावर डांंबरीकरण केले आहे. पुन्हा करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे चेंबर आणि त्यावरील झाकणे डांबरीकरणात झाकली गेली आहेत. त्यावरून वाहने गेल्यानंतर हा भाग खचून पुन्हा रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही झाकणे पुन्हा बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाला ही कामे दुसऱ्यांदा करण्याची वेळ आली आहे. चेंबरची वर-खाली झालेली झाकणे दुरुस्त केल्यानंतर ‘मिशन १५’अंतर्गत त्याच रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. ज्या रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे आणि चेंबरची झाकणे पुन्हा वर-खाली झाली आहेत, त्याचा शोध घेत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या पथ विभागाने केले आहे.

डांबरीकरणानंतर चेंबरची कामे तातडीने केली जात आहेत. यासाठी ४५ अभियंत्यांकडून पुन्हा एकदा रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पुढील आठ दिवसांत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे, चेंबरची दुरवस्था याची माहिती गोळा करून सर्व कामे पूर्ण केली जातील, असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader