कोरेगाव पार्क येथील एका सराफी पेढीवर पडलेला दरोडा हाचित्रपटातील थरारक दृश्याची आठवण करुन देणारा असाच होता. अतिशय नियोजनबद्धरीतीने टाकण्यात आलेल्या या दरोडय़ात दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकाने तब्बल एक कोटी चाळीस लाखांचे दागिने लुटले होते. विशेष म्हणजे या लुटीत एक तरुणीदेखील सामील झाली होती. या लुटीचा छडा लावण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, गेले पावणेदोन वर्षे सुरू असलेल्या तपासानंतरही सराफी पेढीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर मोकाटच आहेत.
कोरेगांव पार्क हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. पुणे शहरातील अनेक नामवंत व्यावसायिक या परिसरात वास्तव्यास आहेत. ओशो आश्रमदेखील या परिसरात आहे. त्यामुळे कोरेगाव पार्कची ओळख जगभरात आहे. या भागात तारांकित हॉटेल्स आहेत. परदेशी पर्यटक तसेच उद्योजकांचा वावर या परिसरात असतो. नाताळात हा परिसर गजबजलेला असतो. कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक सहा येथे २४ डिसेंबर २०१४ रोजी नाताळाच्या काळात ‘पीएनजे हाऊस’ या सराफी पेढीवर दरोडा पडला. चोरटय़ांनी पिस्तुलाच्या धाकाने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत तब्बल एक कोटी चाळीस लाखांचे दागिने तेथून लुटले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. जर्मन बेकरी बाँबस्फोटानंतर कोरेगाव पार्क परिसरात घडलेला हा दुसरा गंभीर गुन्हा होता. भरदिवसा सराफी पेढीवर पडलेल्या दरोडय़ामुळे शहरातील सराफ व्यावसायिकही धास्तावले होते.
पीएनजे हाऊस या सराफी पेढीत २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास एक महिला आणि तिच्याबरोबर असलेली एक व्यक्ती ग्राहक म्हणून खरेदीच्या बहाण्याने शिरले. त्यानंतर लगोलग त्यांचे दोन साथीदार सराफी पेढीत आले. टापटिपीने कपडे परिधान केलेल्या चौघांचा सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांना संशयदेखील आला नाही. चौघांनी सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांक डे दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी त्यांना लगोलग दागिने दाखविण्यास सुरुवात केली. अचानक एका चोरटय़ाने त्याच्या कंबरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले आणि सराफी पेढीच्या काऊंटरवर असलेल्या कर्मचाऱ्यांना दाखविले. हिंदी चित्रपटातील खलनायक धमकावितो त्याप्रमाणे त्याने सर्व कर्मचाऱ्यांना जागेवरच थांबण्याची सूचना केली. जरा हालचाल केलीत तर गोळी घालेन, अशी धमकी त्याने सर्वाना दिली. क्षणभर काय करावे हे कर्मचाऱ्यांना कळले नाही. हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या चोरटय़ांनी पटापट दागिने पिशवीत भरले आणि सराफी पेढीसमोर लावलेल्या मोटारीतून पोबारा केला. त्यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
परिमंडल दोनचे तत्कालीन पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची नाकाबंदी करण्याची सूचना केली. गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी तातडीने तपास सुरु केला. संशयित चोरटय़ांकडे चौकशी सुरु करण्यात आली. तपासपथकांना चित्रीकरणातून चोरटय़ांचा माग काढता आला नाही. दरम्यान, सराफी पेढीवर दरोडा टाकण्यासाठी वापरलेली मोटार ही मुंढवा भागातील एका व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले. दरोडा घालण्यापूर्वी दोन दिवस आधी त्या मोटारीची चोरी झाली होती. मोटारीच्या मालकाने त्या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याचा लुटीत हात असल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीला होता. ती शक्यता लक्षात घेऊन सराफी पेढी दक्षिणेकडील राज्यातील असल्याने पोलिसांचे पथक आठ दिवस हैद्राबाद येथे तळ ठोकून होते. त्यानुसार तेथे अनेकांगांनी चौकशी करण्यात आली. हैद्राबादपासून मुंबईपर्यंत दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सराफी पेढीतील प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलिसांनी चौकशी केली. कर्मचाऱ्यांवर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले आहेत का, याचीही माहिती घेण्यात आली. त्यांचे मूळ गाव, नाव शोधून काढण्यात आले. त्याबरोबरच तांत्रिक तपासदेखील करण्यात आला होता. परराज्यातील विशेषत: दक्षिणेकडील चोरटय़ांच्या टोळ्यांची माहिती त्यासाठी मिळवण्यात आली होती. सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात आल्यानंतरही दरोडेखोरांचा माग काढता आला नाही.