पुणे : रिक्षा, कॅब अथवा खासगी बसने भाडे नाकारले, जादा भाडे घेतले, अशा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण आता जलद होणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) यासाठी पाऊल उचलले आहे. प्रवासी आता व्हॉट्स ॲप हेल्पलाइन क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतील. त्यावर आरटीओकडून तातडीने कारवाई केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या तक्रारी प्रवासी नेहमी करतात. याचबरोबर अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात अथवा त्यासाठी भाड्यापेक्षा जास्त पैसे मागतात. अनेक जण मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. याचबरोबर कॅबचालक आणि खासगी बसचालकांबद्दलही प्रवाशांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत. मागील काही दिवसांपासून या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, तक्रार करावयाची झाल्यास ती कशी करावयाची हा मूळ प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहतो. लेखी तक्रार देण्यासाठी आरटीओमध्ये जाण्यात त्यांना वेळ घालवावा लागतो.

हेही वाचा…धक्कादायक : पुण्यात अल्पवयीन मुलाने टँकर चालवत महिला आणि मुलीला उडविल

आता आरटीओने प्रवाशांना सहजपणे तक्रार करता यावी, यासाठी व्हॉट्स ॲप हेल्पलाइन क्रमांक ८२७५३३०१०१ सुरू केला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची तक्रार या क्रमाकांवर केल्यानंतर आरटीओचे अधिकारी या तक्रारीची शहानिशा करतील. ही शहानिशा झाल्यानंतर तातडीने दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. या व्हॉट्स ॲप हेल्पलाइनमुळे नियमभंग करणाऱ्यांवरील कारवाईची प्रक्रिया जलद होणार आहे.

हेही वाचा…बीबीए, बीसीए पुरवणी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी कधी?

तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक – ८२७५३३०१०१

भाडे नाकारणे अथवा जादा भाडेआकारणी अशा तक्रारी प्रवासी करतात. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने करण्यासाठी व्हॉट्स ॲप हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rto launches whatsapp helpline for speedy redressal of fare refusal and overcharging complaints pune print news stj 05 psg