पुणे : नगर रस्त्यावरील रांजणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे वास्तव्य करण्यासाठी लागणारे कागदपत्रे सापडली आहेत. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (२४ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान (वय ५०), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय ३२) शफिकउल अलीमिया शेख (वय २०) हुसेन मुखिद शेख (वय ३०) तरिकुल अतियार शेख (वय ३८) मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख (वय ३२) शाहिन शहाजान शेख (वय ४४) मोहम्मद हुसेन शेख (वय ३२) रौफ अकबर दफादार (वय ३५) इब्राहिम काजोल शेख (वय ३५) फरीद अब्बास शेख (वय ४८) मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय ३५) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (वय ३२) आलीमिया तोहकील शेख (वय ६०) मोहम्मद इसराईल फकीर (वय ३५) फिरोजा मुताकीन शेख (वय २०) लिपोया हसमुख मुल्ला (वय ३२) सलमा मलौक रोशन मलीक (वय २३) हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला (वय ४०) सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश (वय ३०) येअणुर शहदाता मुल्ला (वय २५, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर,, मुळ रा बांगलादेश) अशी पकडलेल्यांची नावे आहेत. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे रहिवासासाठी लागणारे कागदपत्रे सापडली असून, त्यांना कागदपत्रे कोणी दिली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

हेही वाचा…सोने, चांदीच्या भावात वाढ होण्याची कारणे अन् आगामी काळात भाव कमी होणार का? जाणून घ्या…

यापूर्वी जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कावाई करण्यात आली होती. रांजणगाव ओैद्योगिक वसाहत परिसरातील कारेगावजवळ बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती सहायक फौजदार विशाल गव्हाणे यांना मिळाली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी या भागात शोधमोहिम राबविली. बांगलादेशी नागरिक भाडेतत्त्वार खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन कारेगाव भागातून २१ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. या कारवाईत १५ पुरुष, ४ महिला, दोन तृतीयपंथीयांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी घुसखोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून मतदार कार्ड जप्त करण्यात आले आहे.