पुणे : विकासाच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी केलेले सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, त्यावर केलेली अतिक्रमणे यामुळे शहरावर पूरस्थिती ओढवली. तसेच, पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची कामे पूर्ण केल्याचा महापालिकेचा दावाही खोटा ठरल्याचे उघड झाले. त्यामुळे पुणे शहर ‘स्मार्ट सिटी’ होण्याऐवजी अधिकाधिक गाळात जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले.

शहरात ठिकठिकाणी पाणी साचून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. २०१९ मध्ये आंबिलओढ्याला आलेल्या पुराची पुनरावृत्ती यंदा झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भूगोल आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, ‘धरणक्षेत्रात जवळपास २०० मिलिमीटरपेक्षा जास्त, तर शहरातही ११५ मिलिमीटर पाऊस पडला. कमी वेळात जास्त पाऊस, शहरातील वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची अपुरी क्षमता यामुळे पाणी साचले. त्याशिवाय सिमेंटचे रस्ते असलेल्या भागात पाणी साचून राहण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: चौकांमध्ये पाणी साचते. ओढे, नाले बुजवण्यात आले आहेत, त्यांचे प्रवाह वळविण्यात आले आहेत. नैसर्गिक प्रवाहांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी ते इतरत्र पसरते. नाले, ओढे, सांडपाणी वाहिन्यांत साठून राहिलेल्या प्लॅस्टिकमुळेही पाणी वाहून जाण्यास अटकाव निर्माण होतो.’

हेही वाचा…पाऊस कहाणीच्या साठा ‘उत्तरी’… पुन्हा प्रश्नांचा पाऊसच!

पूररेषेच्या परिसरात बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र, शहरात पाणी भरलेले बहुतांश भाग पूररेषेतील बांधकामाचे आहेत. त्यामुळे अशा बांधकामांना परवानगी कशी मिळते,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी वाहिन्या साफ करणे आवश्यक असते. मात्र, शहरातील परिस्थिती पाहिल्यास यंदा हे काम महापालिकेने केले का प्रश्न आहे,’ असे त्यांनी नमूद केले.