वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असून, उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरे तर पुण्यातील गणेशोत्सव आकर्षणाचा विषय. देशभरातील भाविक पुण्यात खास गणेशोत्सवात येतात. परदेशी पर्यटक उत्सवात हजेरी लावतात. दहा दिवसांच्या उत्सवात अनेक हात झटतात. अनेकांना रोजगार मिळतो आणि मोठी आर्थिक उलाढालही होते. दहा दिवसांच्या उत्सवाच्या नियोजनाची जबाबदारी पोलिसांवर असते. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अहोरात्र रस्त्यावर तैनात असतात. पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या बळावर उत्सव निर्विघ्न पार पडतो. पुण्यातील गणेशोत्सवाची ओळख सामाजिक सलोख्याची परंपरा जपणारा उत्सव म्हणून आहे. उत्सवाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामांना चालना मिळाली आहे. अशा या उत्सवाच्या आगमनाची वार्ता चैतन्यदायी आहे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवाची तयारी जून-जुलै महिन्यात सुरू होते. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर कार्यकर्त्यांना उत्सवाचे वेध लागतात. कामानिमित्त विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाते. बैठकीच्या माध्यमातून उत्सवाचे नियोजन केले जाते. उत्सवातील देखाव्याचे काम तर सहा महिने अगोदर सुरू केले जाते. साधारण तीस-चाळीस वर्षांपूर्वी मंडळाचे कार्यकर्ते स्वत: देखावा साकारायचे. आता परिस्थिती बदलली आहे. मंडळांकडून आता वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव म्हणजे कार्यकर्ता घडविणारी शाळा आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक राजकीय कार्यकर्ते घडले. मंडळांमुळे कार्यकर्त्यांना सामाजिक भान आले. त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले. सामाजिक जीवनातील अनेक प्रसंगांना कसे सामोरे जायचे, याचेही प्रशिक्षण मंडळांमुळे मिळाले.

हेही वाचा…आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे – स्वप्नील कुसाळे

खरे तर पुण्यातील विविध सार्वजनिक मंडळे वर्षभर सक्रिय असतात. उत्सवाकडे फक्त दहा दिवसांचा उत्सव म्हणून न पाहता वर्षभर समाजोपयोगी उपक्रम कसे राबविले जातील, याचेही भान कार्यकर्त्यांना असते. अडीअडचणीला धावून जाणे, गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप, पालकत्व योजना, रुग्णांसाठी योजना, समाजातील वंचित घटकांसाठी उपक्रम राबविणारी अनेक मंडळे पुण्यात आहेत. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता कार्यकर्ते, पदाधिकारी अविरत काम करतात. उत्सवाचा डामडौल जपत अनेक मंडळांनी सामाजिक कार्यकर्त्याचा वसा जपला आहे. परंपरा जपणारी आणि समाजोपयोगी कामे करणारी अनेक मंडळे आहेत. संघटनशक्तीमुळे हे सारे शक्य होते.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. सजावट, रोषणाईवर वारेमाप खर्च केला जात आहे. ध्वनिवर्धकांच्या भिंती, त्यांचा दणदणाट, डोळे दिपवणाऱ्या लेझर दिव्यांमुळे सामान्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यातील गणेशोत्सव विधायक कार्य करणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी उत्सव काहीसा भरकटलेला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. उच्चशिक्षितांपासून कष्टकऱ्यांपासून उत्सवात सक्रिय असतात. हजारो कार्यकर्त्यांचा बळावर उत्सव पार पडतो.

उत्सवातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस बंदोबस्त. दहा दिवसांच्या उत्सवात बंदोबस्त ठेवणे, उत्सव शांततेत पार पाडणे सोपे काम नाही. प्रतिष्ठापना सोहळ्यापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत पुण्यात अहोरात्र बंदोबस्त तैनात असतो. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे, तसेच वाहतूक नियोजनाची जबाबदारी पोलिसांवर असते. उत्सव सुरू होण्यापूर्वी दर वर्षी पोलिसांकडून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाते. बैठकीत पोलिसांकडून सूचना दिल्या जातात. मध्य भागात उत्सवाच्या काळात होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे सोपे काम नाही. भाविकांसाठी मार्ग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. संभाव्य घातपाती कारवायांचा विचार करून बंदोबस्ताची आखणी केली जाते. उत्सवात गैरप्रकार होतात. दागिने, मोबाइल संच चोरीला जातात. उत्सवाच्या काळात परराज्यांतील चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय होतात. चोरट्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना उत्सव पार पाडावा लागतो. उत्सवातील चांगल्या-वाईट बाबी विचारात घेऊन उत्सव शांततेत कसा पार पडेल, याचे नियोजन करावे लागते. गणेशोत्सवातील बंदोबस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो.

हेही वाचा…Dahi Handi Celebrations In Pune : नियमभंगाचेही थरावर थर!

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी रोवली. शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवातून अनेक कार्यकर्ते घडले. हजारो कार्यकर्त्यांना एकाच छताखाली आणणाऱ्या उत्सवातील गैरप्रकारांवर टीकाही मोठ्या प्रमाणावर होते. उत्सवातील ध्वनिवर्धकांचा दणदणाट, लेझर दिव्यांच्या वापराबाबत कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याची गरजही निर्माण झाली आहे. प्रत्येक वेळी कायद्याचा दंडुका उगारून परिस्थिती सुधारता येत नाही. ध्वनिवर्धक, लेझर दिव्यांवर होणारा खर्च कसा अनाठायी आहे, हेदेखील पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी उत्सवातील ज्येष्ठ, अनुभवी कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

rahul.khaladkar@expressindia.com