पुणे : झाडे किती कार्बन शोषून घेतात, याची नेमकी मोजणी करणारे उपयोजन मूळ पुणेकर संशोधकाने विकसित केले आहे. ही माहिती गोळा केल्यावर एखादे क्षेत्र, गाव वा शहरासाठीचे ‘नेट झीरो’ उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हणजेच तेथील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी किती आणि कोणत्या प्रकारची झाडे लावणे आवश्यक आहे, हे ठरविणे शक्य होणार आहे.

‘द ग्रीन कन्सेप्ट’ या नवउद्यमीने ‘ट्री कार्बन कलेक्ट’ हे उपयोजन विकसित केले आहे. या उपयोजनाद्वारे नुकतेच प्रभात रस्त्यावरील झाडे किती कार्बन शोषून घेतात, याची मोजणी करण्यात आली. प्रभात रस्त्याच्या दीड किलोमीटरच्या परिसरातील ३० प्रजातींच्या १०१ झाडांनी ११६.५५ टन कार्बन शोषला असल्याचे त्यातून समोर आले. हा कार्बन ४२७.७४ टन कार्बनडाय ऑक्साइड इतका आहे. एखाद्या उद्योगाला ‘कार्बन क्रेडिट’ जमा करण्यासाठीही या मोजणीचा वापर होऊ शकणार आहे.

हेही वाचा : पुणे: गणेशोत्सवात भाविकांसाठी २७ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था

‘द ग्रीन कन्सेप्ट’ ही नवउद्यमी डॉ. रोहन शेट्टी, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अबोली कुलकर्णी यांनी स्थापन केली आहे. डॉ. रोहन शेट्टी पर्यावरणशास्त्रज्ञ, डॉ. गिरीश कुलकर्णी गणितज्ञ आणि मशिन लर्निंग तज्ज्ञ, तर डॉ. अबोली कुलकर्णी कार्बनतज्ज्ञ आहेत. त्यांनी विकसित केलेल्या ‘ट्री कार्बन कलेक्ट’ उपयोजनाद्वारे झाडांनी शोषलेल्या कार्बनडाय ऑक्साइडचे पृथक्करण करणे शक्य आहे. या उपयोजनामध्ये इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंजने (आयपीपी) निश्चित केलेल्या मानकांनुसार झाडांच्या नोंदी घेतल्या जातात. झाडांच्या वाढीनुसार कार्बन शोषणाची माहिती साठवता येते. त्याचप्रमाणे मोजणी केलेल्या झाडांचे ‘जिओ टॅगिंग’ म्हणजे ते कुठे आहे, त्याची नोंद करण्याचीही सुविधा आहे.

डॉ. शेट्टी म्हणाले, ‘जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. भारतात २०२६मध्ये कार्बन बाजारपेठेचा प्रारंभ होईल, ज्याद्वारे उत्सर्जनाच्या बदल्यात झाडे लावून कार्बन क्रेडिट घेता येतील. त्यामुळे अनेक उद्योग त्यांचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करू लागल्या आहेत. झाडे कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेतात. पण, झाडांच्या कार्बन शोषून घेण्याचे मानक आयपीसीसीने निश्चित केले आहे. त्यानुसार झाडांची पाहणी करून झाडांनी शोषलेल्या कार्बनची किंवा कार्बन शोषणाच्या क्षमतेची माहिती तपासते येते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘ट्री कार्बन कलेक्ट’ हे उपयोजन विकसित केले. या उपयोजनाच्या चाचणीसाठी ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. अपर्णा वाटवे यांच्या बरोबर प्रभात रस्त्यावरील १०१ झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात झाडांची शास्त्रीय माहिती उपयोजनात भरून झाडांनी शोषलेल्या कार्बनचा तपशील हाती आला. अशा प्रकारे काम करणारे हे भारतातील पहिले उपयोजन आहे. उपयोजनाला आणखी प्रभावी तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दृष्टीनेही अभ्यास करण्यात येत आहे.’

हेही वाचा : Ganesh Utsav 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन! सिंह रथातून निघाली मिरवणूक, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत, पाहा Viral Video

व्यापक स्तरावर वापर शक्य

‘शासकीय संस्थांसाठी ‘ट्री कार्बन कलेक्ट’ उपयोजन उपयुक्त आहे. हे उपयोजन मोठ्या स्तरावर वापरण्यासाठीही सक्षम आहे. याद्वारे सार्वजनिक ठिकाणच्या झाडांचे सर्वेक्षण करून त्यांनी साठवलेल्या कार्बनचे पृथक्करण करता येऊ शकते. त्यामुळे अजून किती कार्बन उत्सर्जन आटोक्यात आणणे गरजेचे आहे आणि त्यासाठी किती आणि कोणती झाडे लावावी लागतील, हे ठरविणेही शक्य होईल,’ असे डॉ. रोहन शेट्टी यांनी सांगितले.